लातूर- लॉकडाऊनमुळे गेल्या महिन्याभरापासून पुणे जिल्ह्यातील जाधववाडी नारायणगाव येथील १३४० तपस्वी साधक-साध्वी हे निलंगा येथे अडकून पडले आहेत. त्यांच्या राहण्याची सोय येथील राठोडा शिवारात करण्यात आली होती. मात्र, साधक ज्या तंबूत रहात होते तो पावसाने उध्वस्त झाल्याने सर्व साधक गावातील शाळेत आणि मंदिरात वास्तव्यास आहेत. मात्र, अपुरी जागा आणि आवश्यक सोयीसुविधांच्या आभावामुळे त्यांना त्रास होत आहे. मंत्री राजेश टोपे यांनी साधक-साध्वींना सोयी पुरवण्याचे आश्वासन दिले आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज निलंगा येथे अडकून पडलेल्या साधक-साध्वींशी फोनवरून संवाद साधला असून त्यांना आहे त्याच ठिकाणी राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्या ठिकाणी सर्व सोयही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले आहे. चार्तुमास महिण्यातील कार्यक्रमासाठी निलंगा तालुक्यातील राठोडा येथे १३४० साधक आले होते. परंतु, संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू महामारीमुळे देशात संचारबंदी लागू झाली. त्यात निलंगा तालुक्यात आलेले ५२० पुरुष साधक आणि ८५० साध्वी हे राठोडा गावात अडकले आहेत. मात्र, सोमवारी सांयकाळी ७ च्या सुमारास गावात अचानक वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. यात साधक-साध्वींना राहण्यासाठी उभा केलेला मोठा मंडप वाऱ्याने उडून गेला.