लातूर- जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असले तरी आज गणेश चतुर्थीच्या दिवशी लातुरकरांनी गणरायाचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. शहरातील मुख्य बाजारपेठेत सकाळपासूनच नागरिकांची गणेशमूर्ती खरेदीसाठी गर्दी जमली होती. दुष्काळाबरोबरच यंदा गणेशमूर्तीच्या किमतीमध्ये १० टाक्यांनी वाढ झाली होती. मात्र असे असतानाही नागरिकांनी उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाचे स्वागत केले.
शहरात राजस्थानी विद्यालय, शिवाजी चौक, नवीन रेणापूर नाका, औसा रोड या ठिकाणी गणेशमूर्तींचे स्टॉल थाटण्यात आले होते. दुष्काळाच्या छायेत जरी यंदाचे सण असले, तरी आज गणेशमूर्ती स्थापनेच्या दिवशी गणेशभक्तांनी गर्दी केली होती. सकाळच्या सत्रात घरगुती गणपती स्थापनेसाठी नागरिकांनी कुटुंबासमवेत उपरोक्त ठिकाणी हजेरी लावली होती. या ठिकणांहून गणेशमूर्तीबरोबरच सजावटीचे साहित्यही नागरिकांनी खरेदी केले होते.