लातूर- १७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे मताधिक्य २०१४ पेक्षा वाढले आहे. राज्यात मात्र या वाढलेल्या मताधिक्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार हे नक्की आहे. तसेच काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या लोकसभेच्या लातूर मतदारसंघात एकाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आाघाडी मिळाली नाही. आघाडी तर दूरच परंतु गतवेळपेक्षा यंदाच्या निवडणुकीत अधिकची मते घटली आहेत. यामुळे लातूर शहरासह लातूर ग्रामीण आणि औसा या काँग्रेसच्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघात काँग्रेससाठी धोक्याची 'घंटा' मानली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत ११ लाख ८० हजार मतदान झाले होते, यापैकी ५० टक्यांहून अधिकचे मतदान भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांना मिळाले आहे. तर काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांना ३ लाख ७० हजारावर समाधान मानावे लागले आहे. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार राम गारकर यांना १ लाखाहून जास्त मते मिळाली असली तरी याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला आहे.
काँग्रेसकडे लातूर शहर, लातूर ग्रामीण आणि औसा या विधानसभा आहेत. या तीनही ठिकाणी गतवेळपेक्षा अधिकचे मताधिक्य भाजपच्या पारड्यात पडले आहे. लातूरच्या ग्रामीण भागात देशमुख यांचे साखर कारखाने आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे संघटन आणि कारखान्यांवरील कामगारांचा गट यामुळे या मतदारसंघात काँग्रेसचा गड कायम राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपलाच मताधिक्यम मिळते. मात्र, यंदा यामध्ये वाढ झाल्याने काँग्रेसच्या अडचणीत भर पडली आहे. या विधानसभा मतदारसंघात भाजप तब्बल ३५ हजार मताने आघाडीवर राहिले आहे.