लातूर - दुष्काळ असो की अवकाळी, निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. हे कमी म्हणून की काय आता कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होऊ लागला आहे. सध्या रब्बीची काढणी अंतिम टप्प्यात आहे मात्र, पिके जोमात असतानाच पडलेली धुई आणि अवकाळी यामुळे तर उत्पादनात घट झालीच आहे पण आता कोरोनामुळे संचारबंदी लागू झाल्याने वाहतूक बंद आहे. परिणामी पिकांची साठवणूक केल्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही. रब्बीच्या पिकाचा अहवाल थेट शिवारातून...
बळीराजा संकटात : कामासाठी शेतात मजूर नाहीत अन् बाजारात मालाला भाव नाही - latur farmers
सध्या रब्बीची काढणी अंतिम टप्प्यात आहे मात्र, पिके जोमात असतानाच पडलेली धुई आणि अवकाळी यामुळे तर उत्पादनात घट झालीच आहे पण आता कोरोनामुळे संचारबंदी लागू झाल्याने वाहतूक बंद आहे
पिके जोमात असतानाच ढगाळ वातावरण आणि धुई पडल्याने ज्वारी, गहू, हरभरा या मुख्य पिकांचे उत्पादन घटले आहे. ऐन रब्बीच्या काढणीतच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि संचारबंदी लागू झाली. कोरोनाच्या धास्तीने मजुरांनीही शेताकडे पाठ फिरवली आणि शेतकऱ्यांना कुटुंबातील सदस्यांनाच घेऊन शेतीमधील उभी पीक काढावी लागली. रब्बीची काढणी अंतिम टप्प्यात आहे मात्र, सोयाबीन प्रमाणेच आता रब्बीतील मालही शेतकऱ्यांना घरातच साठवून ठेवावा लागणार आहे. कारण सध्या वाहतूकही ठप्प आहे आणि बाजार समित्याही बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळले नसले तरी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा परिणाम झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत निसर्गाशी दोन हात करीत असलेला बळीराजा कोरोनाच्या संकटालाही सामोरे जात आहे.
निर्यात बंद असल्याने द्राक्ष बागांचे नुकसान होत आहे तर बाजार समित्या बंद असल्याने शेतीमाल काढूनही शेतकऱ्यांच्या पदरी अद्याप दमडीही पडलेली नाही. त्यामुळे बळीराजाची आर्थिक कोंडी झाली असून आता खरेदी-विक्री सुरू झाली तरी दर किती मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.