लातूर -जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शहरात 3 दिवसीय युवा महोत्सव पार पडत आहे. उद्घाटनासाठी आमंत्रण पत्रिकेवर आमदार आणि मंत्र्यांच्या नावाची यादीच होती. मात्र, सध्याच्या राजकीय हालचाली पाहता एकही आमदार किंवा मंत्री या उद्घाटन प्रसंगी उपस्थित नव्हते. त्यामुळे मनपाचे महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले.
3 दिवस होणाऱ्या या युवा महोत्सवासाठी 8 विभागातून विद्यार्थी येथे दाखल झाले आहेत. जिल्हा क्रीडा संकुलनात शनिवारी सायंकाळी 7 च्या दरम्यान हा उद्घाटन समारंभ पार पडला. कॅबिनेट मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमप्रकाश निंबाळकर, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार सुरेश धस, आमदार धीरज देशमुख यासारख्या अनेक मान्यवरांची नावे निमंत्रण पत्रिकेत होती. मात्र, यापैकी एकही राजकीय नेता या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित नव्हते.