लातूर - कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम ट्रॅव्हल्स चालकांवरही झाला आहे. आता ट्रॅव्हल्स सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. असे असले तरिही राज्य सरकारने ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या मागण्या मान्य केल्या तरच ट्रॅव्हल्स सुरू होतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रॅव्हल्सधारकांना आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मागील तीन महिन्यापासून ट्रॅव्हल्स या बंद आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल्स मालकांसह यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अवलंबून असणाऱ्या घटकाला आर्थिक झळ बसलेली आहे. आता नव्याने ट्रॅव्हल्स सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली असली, तरी रॉड टॅक्स, इन्शुरन्सचा कालावधी, बँक कर्जावरील व्याज माफ करावे यासारख्या मागण्या ट्रॅव्हल्स असोसिएशने समोर केल्या आहेत.
लातूर ट्रॅव्हल्स असोशिएनच्या सरकारकडे विविध मागण्या... हेही वाचा...पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सलग चौथ्या दिवशी वाढ; पेट्रोल 40, तर डिझेल 45 पैशांनी वाढले
एका बसला वर्षाकाठी 20 हजाराचा टॅक्स भरावा लागतो. यामध्ये किमान एका वर्षाचा टॅक्स माफ करावा, सहा महिन्यांचा इन्शुरन्स वाढवून द्यावा, व्यवसाय तारण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, बँक कर्जावरील सहा महिन्याचे व्याज माफ करावे, पेट्रोल- डिझेलवरील अतिरिक्त कर तात्काळ रद्द करावा, किमान एक वर्षाचा जीएसटी माफ करावा, अशा मागण्या या ट्रॅव्हल्स असोसिएशने केल्या आहेत.
प्रत्येक घटकावर या कोरोनाने उदभवलेल्या परिस्थितीचा परिणाम झाला आहे. शिवाय शारीरिक अंतर पाळून प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक झळही सहन करावी लागत आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स मालकांसह चालक, वाहक शिवाय यावर अवलंबून असलेल्या घटकाला आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने मागण्या मान्य करण्याचा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. शिवाय मागण्या मान्य न झाल्यास सोमवारी आरटीओ कार्यालयासमोर ट्रॅव्हल्स घेऊन आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कार्याध्यक्ष बबलू तोष्णीवाल यांनी दिला आहे.