लातूर - लातूर ग्रामीणचे उमेदवार सचिन देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसैनिकांनी राडा घातला. प्रचाराचा शेवटचा दिवस असतानाही देशमुख गांभीर्य न दाखवता मतदारसंघातून गायब राहिले आहेत. सचिन देशमुख यांनी पक्षाशी आणि शिवसैनिकांशी दगाबाजी केल्याचा आरोप युवासेनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला आणि एकच गोंधळ उडाला.
हेही वाचा -EVM म्हणजे नेमकं आहे तरी काय..?
लातूर ग्रामीण हा परंपरागत भाजपचा मतदारसंघ राहिला आहे. यावेळी मात्र, युतीची गणिते जुळवून घेण्यासाठी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला आणि उमेदवारी नवख्या सचिन देशमुख यांना देण्यात आली. यावरून तिकीट जाहीर झाल्यापासून महायुतीमधील घटक पक्ष तसेच सेनेमधील पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. राज्यात युती सरकार असूनही उमेदवार विजयी होण्याच्या दृष्टीने प्रचार करीत नाही. मतदारसंघातून गायब आहे, असे एक ना अनेक आरोप सचिन देशमुख यांच्यावर केले जात होते. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप सूर्यवंशी यांनी थेट उमेदवारालाच लक्ष्य करत पक्षाशी तुम्ही गद्दारी केली आहे, तुमच्या अशा वागण्याने पक्षाची बदनामी झाली, असे आरोप केल्याने एकच गोंधळ उडाला.