लातूर- लातूर ग्रामीण हा परंपरागत भाजपचा मतदारसंघ असून यंदा शिवसेनेला सोडण्यात आला आहे. या मतदारसंघात शिवसेनेची ताकत नसतानाही घेण्यात आलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ लातूर ग्रामीण मतदार संघातील रेणापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी रेणापूर फाटा येथे रास्ता रोको केला.
हेही वाचा-राणे समर्थक सतीश सावंत कणकवलीतून अपक्ष लढणार; नितेश राणेंना फोडणार घाम?
भाजप इच्छुक रमेश कराड समर्थकांनी, 'परत द्या, परत द्या लातूर ग्रामीण परत द्या' अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या रास्ता रोकोमुळे लातूर-अंबाजोगाई नॅशनल हायवेवर वाहतूक तासभर ठप्प झाली होती. भाजपची मजबूत आणि भक्कम ताकत असलेला लातूर ग्रामीण मतदारसंघ अचानक शिवसेनेला सोडून लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नामोनिषान पुसून टाकण्याचा घाट पक्षश्रेष्ठीने घातल्याचे दिसत आहे. मुंडे यांनी अठरा पगड जातीला सोबत घेवून महाराष्ट्रात भाजपच्या विचाराचे आणि संघर्षाचे राजकारण केले. या मतदार संघाची जबाबदारी रमेशअप्पा कराड यांच्यावर सोपविली. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात भाजपची मोठी ताकत असल्याने यावेळी विजय निश्चित असताना ऐनवेळी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला. यामुळे कार्यकर्त्यांत तिव्र नाराजी पसरली आहे.