लातूर - एक अफवा आणि अवघ्या काही तासात हजारो भक्त भक्तीस्थळावर... डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज लिंगायत समाजातील लाखो नागरिकांचे श्रद्धस्थान. मागील तीन पिढ्यावर डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा प्रभाव या समाजावर आहे. मात्र, महाराज जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा रात्रीतून पसरली जाते आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार न करता हजारो भक्त महाराज वास्तव्य करीत असलेल्या भक्तीस्थळाकडे धाव घेतात. ही अफवा पसरली की पसरवली. भक्तांच्या मनात अपार श्रद्धा असली तरी उत्तराधिकरी आणि भक्ती मंडळाचे अध्यक्ष यावरून नेमक्या काय घडामोडी झाल्या या पडद्यामागचे सत्य मांडण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'ने केला आहे.
अधिक माहिती देताना आमचे प्रतिनिधी राजेंद्र खराडे....
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९१७ साली झाला. धर्माचा प्रसार आणि प्रचार करीत असताना लिंगायत समाजाला एका ऊंचीवर पोहचवण्यासाठी त्यांनी आपले जीवन अर्पण केले आहे. धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी तीन पिढ्यांचा अभ्यास केला आहे. मात्र, अहमदपूरकर मठाचे उत्तराधिकारी आणि भक्ती मंडळाचे अध्यक्ष यावरून ज्या घडामोडी दोन दिवसांत घडलेल्या आहेत त्या भक्तांना आणि लिंगायत समाजातील प्रत्येक घटकाला विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत.
वयाची १०३ वर्षे पूर्ण केलेल्या डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे कायम भक्तांमध्ये राहिलेले आहेत आणि समाज सुधारणेचाच ध्यास त्यांनी घेतलेला आहे. या करिता राजकीय व्यासपीठावरून बोलण्यासही त्यांनी कधी मागे-पुढे पाहिले नाही. ज्याप्रमाणे भक्तांची त्यांच्यावर आस्था आहे, त्याचप्रमाणे उत्तराधिकारी आणि ट्रस्टचे अध्यक्ष नेमताना कुटूंबातील आणि मंडळातील सदस्यांनी दाखवायला हवी होती. मात्र, जिवंत समाधीचा विधी कधी करायचा आणि त्याचे अंत्यसंस्कार कसे? असे प्रश्न थेट महाराजांनाच विचारले असल्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. बर ज्या दिवशी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी बदलण्यात आला कसा? हा प्रश्न उपस्थित होतो. एका रात्रीत बऱ्याच घटना घडल्या आणि सोशल मीडियावर महाराज जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरली की पसरविण्यात आली हा देखील महत्वाचा विषय आहे.
काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील मानूर मठाचेही असेच झाले होते. यामधून भक्तांमध्ये आणि ट्रस्ट सदस्यांमध्ये वादंग निर्माण झाले होते. कारण होते ते उत्तराधिकारी ट्रस्टकडे असलेली जागा. भक्तांची श्रद्धा ही निस्वार्थी असते पण जेव्हा उत्तराधिकारी आणि ट्रस्टचे अध्यक्ष असले विषय समोर येतात तेव्हाच जवळचेही स्वार्थ साधण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. जे मानूर मठाच्या बाबतीत झाले तसाच प्रकार आता अहमदपूरकर मठाबाबत होताना दिसत आहे. यातून उत्तराधिकारी नेमला जाईल आणि ट्रस्टचे अध्यक्ष कारभारही हाकतील पण सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो भक्तांच्या श्रद्धेचा. ज्यामप्रमाणे आज अहमदपूरकर मठावर लाखो भाविकांची श्रद्धा आहे तोच भाव कायम राहणेही तेवढेच महत्वाचं आहे.
हेही वाचा -डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या समाधीची अफवा ट्रस्टच्या दबावातून - प्रा. मनोहर धोंडे