लातूर -भाजपच्या दृष्टीने रेल्वे बोगी कारखाना हा महत्वाकांक्षी प्रकल्प राहिला आहे. 30 जानेवारी 2018 या प्रकल्पाचे भूमिपूजन लातूर शहरालगतच्या अतिरिक्त एमआयडीसीच्या 250 एकरात झाले होते. अडीच वर्षांनंतर रेल्वे बोगीचे काम प्रगतीपथावर असले तरी प्रत्यक्ष बोगी रुळावर येण्यासाठी मार्च उजडणार आहे. मात्र, डिसेंबर 2020 पर्यंत या कारखान्यातून बोगी बाहेर पडणार असल्याचा दावा भाजपने केला होता. आणि हाच दावा खरा ठरविण्यासाठी भाजपचे नेते आटापिटा करीत आहेत. अखेर 26 डिसेंबर रोजी या कारखान्यातून बोगी बाहेर पडली असल्याचे सांगण्यात आले. पण सध्या तयार करण्यात आलेला हा एक नमुना असून प्रत्यक्ष बोगी तयार करण्याचे काम मार्चपासून सुरू होणार आहे.
मार्चनंतरच रेल्वे बोगी रुळावर लातूरच्या वैभवात आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी हा मराठवाडा रेल्वे कोच कारखाना महत्वपूर्ण ठरणार आहे. या कारखान्याच्या माध्यमातून 5 हजार युवकांच्या हाताला काम मिळणार आहे. शिवाय भाजपच्या काळात या प्रकल्पाचे उद्घाटन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी डिसेंबर 2020 पर्यंत रेल्वे बोगी या कारखान्यातून बाहेर काढली जाईल, असा दावा करण्यात आला होता. आता ती वेळ येऊन ठेपली आहे. प्रत्यक्ष कामाला सुरवातही आहे पण फॅक्टरीसाठी आवश्यक असलेली उपकरणे ही परदेशातून आयात करावी लागत आहेत. मध्यंतरी कोरोनामुळे 6 महिने फॅक्टरी मधील कर्मचारी हे गावी परतले होते. आद्यपही सर्व कर्मचारी हे रुजू झालेले नाहीत. त्यामुळे कामास विलंब होत आहे. ही वस्तुस्थिती असली तरी डिसेंबर अखेरपर्यंत बोगी कारखान्याबाहेर, हा शब्द खरा ठरविण्यासाठी भाजपने हा सर्व आटापिटा केला. व डेमो म्हणून उभी असलेली बोगी दाखवून दिलेला शब्द पळाला असल्याचा अविर्भाव आणला. पण प्रत्यक्षात बोगीसाठी आवश्यक असलेल्या कारखान्याचा काही भाग आद्यपही पूर्ण झालेला नाही. बोगीला पेंटिंग केले जाणारा भाग आद्यपही पूर्ण नाही, असे असताना बोगी तयार झाली? कसे म्हणता येईल.
रेल्वे मंत्रालयाची परवानगी आणि मगच सुरवात-
चार दिवसांपूर्वी लातूरच्या कोच फॅक्टरीत डेमो म्हणून एक बोगी तयार करण्यात आली आहे. अद्यापही याचे काम अर्धवट असले तरी मार्चपर्यंत या बोगीसंदर्भातला अहवाल रेल्वे मंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे. त्यांच्या परवानगीनंतरच रेल्वे बोगी तयार केली जाणार आहे. वर्षाकाठी 200 रेल्वे बोगी तयार करण्याचे उद्दीष्ट या कारखान्याच्या समोर असणार आहे. मात्र, ही सर्व प्रक्रिया मार्च नंतरच होणार आहे.
कोरोनाचाही कामावर परिणाम-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. आशा परिस्थितीत परराज्यातील कर्मचारी हे गावाकडे गेले होते. शिवाय अधिकतर कर्मचारी हे बिहार, कर्नाटक, आंध्रप्रदेश या ठिकाणचे आहेत. त्यामुळे सहा महिने कामाला ब्रेक लागला होता. सध्या काम सुरू असले तरी पूर्ण क्षमतेने कर्मचारी हे परतलेले नाहीत.
हेही वाचा-ईडी कारवाई प्रकरण : हा तर 'ऑपरेशन लोटस'चा भाग... सत्ताधारी आक्रमक