लातूर - लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. तसेच सर्वसामान्य लातूरकर आणि एक्झिट पोलने वर्तवलेले अंदाज यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. लातूर मतदारसंघात भाजप वर्चस्व कायम ठेवणार असल्याचा अंदाज बहुतांश एक्झिट पोलने वर्तवला असताना सर्वसामान्य नागरिक मात्र, परिवर्तन अटळ असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांची उत्सुकता शिंगेला पोहचली आहे तर उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
लातूर मतदारसंघ 2014 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. मात्र, विलासराव देशमुख यांचे निधन आणि मोदी लाट यामुळे स्थानिक संस्थांपासून ते लोकसभा पर्यंतच्या जागेवर परिवर्तन झाले. लातुरात काँग्रेसला गतवैभव मिळविण्याच्या दृष्टीने आमदार अमित देशमुख यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. त्यांनी स्थानिक मुद्द्यांना हात घालत मोदी सरकार कसे अपयशी ठरले हे पटवून दिले. तर 5 वर्षातील विकासकामे आणि राष्ट्रहित या मुद्यांवर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लक्ष केंद्रित केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेतलेल्या प्रचार सभा यावरून भाजप आपले वर्चस्व कायम ठेवण्यात सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे चित्र मतदान प्रक्रियेदरम्यान होते. राष्ट्रहिताचा मुद्दा आणि केंद्रात मोदी सरकारच यावरून एक्झिट पोलचे अंदाजही भाजपच्या बाजूने आहेत. मात्र, असे असतानाही सर्वसामान्य मतदारांना यंदा परिवर्तन निश्चित होणार असल्याचा विश्वास आहे. 5 वर्षातील सरकारची धोरणे आणि प्रत्यक्ष जनतेला झालेला लाभ यातून प्रचंड नाराजी आहे. आणि हीच बाब 23 मे रोजी निकालातून स्पष्ट होणार असल्याचा विश्वास सर्वसामान्यांना आहे.