महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष : कोरोनाचे संकट तर टळले.. आता महागाईमुळे उद्योग-व्यवसायांना घरघर - लातूर औद्योगिक वसाहत

अनलॉकमध्ये सर्व काही पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्याअनुषंगाने उद्योजक कामालाही लागले पण याच दरम्यान, वाढत असलेल्या महागाईमुळे पुन्हा उद्योजक अडचणीत सापडला आहे. यातच प्रशासनाचे सहकार्य नसल्याने लहान-मोठ्या उद्योजकांवरील संकट हे कायम आहे. कोरोनानंतरची एमआयडीसी कशी आहे याचा आढावा 'ईटीव्ही भारत' ने घेतला आहे.

Latur Industrial Estate Situation
महागाईमुळे लातूरमधील उद्योग-व्यवसायांना घरघर

By

Published : Dec 14, 2020, 7:45 PM IST

Updated : Dec 14, 2020, 7:54 PM IST

लातूर -लॉकडाऊनच्या काळात 800 पैकी केवळ 112 लहान- मोठे उद्योग हे सुरू होते. सहा महिने अशा अवस्थेत लातूर शहरातील एमआयडीसी सुरू होती. त्यामुळे अर्थकारणावर तर परिणाम झालाच शिवाय काही उद्योग हे कायमचे बंद झाले. पण कोरोनानंतर सर्व काही सुरळीत सुरू होईल, अशी आशा होती पण दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे उद्योजकांना उभारी मिळत नाही. कोरोनाचे संकट दूर होत असले तरी कच्च्या मालाच्या किंमती, मंजुरी आणि वाहतुकीवर वाढत असलेल्या खर्चामुळे उद्योजकांचा पाय आणखीन खोलात जात आहे.

महागाईमुळे लातूरमधील उद्योग-व्यवसायांना घरघर
'लातूर पॅटर्न'मुळे शहराची वेगळी ओळख -

'लातूर पॅटर्न' मुळे शिक्षण क्षेत्रात शहराची वेगळी ओळख आहे.पण येथील बाजारपेठ आणि एमआयडीसी यामुळे शहराच्या वैभवात भर पडत आहे. जिल्ह्यात 5 तालुक्यात एमआयडीसी उभारण्यात आली आहे.यामध्ये सर्वात जास्त उद्योग हे लातूर एमआयडीसी भागात आहे. कोरोनापूर्वी एकट्या लातूर एमआयडीसी मध्ये 850 उद्योग हे सुरू होते. पण कोरोना संकट ओढावले आणि केवळ 112 उद्योग हे सुरू राहिले होते. त्यामुळे उलाढालीवर तर परिणाम झालाच पण ज्यांनी नुकताच उद्योग सुरू केला होता त्यांचे उद्योग अजूनही बंद आहेत. एमआयडीसीमध्ये लघु आणि मध्यम उद्योग अधिक प्रमाणात आहेत. मात्र, कच्या मालाचा पुरवठा होत नसल्याने तसेच वाहतुकीस अडथळा आणि कामगार गावी परतल्याने तब्बल 6 महिने उद्योग हे बंद होते. आता अनलॉकमध्ये हे उद्योग सुरू झाले आहेत पण वाढती महागाईमुळे उद्योजकांवरील संकटाची मालिका ही कायम आहे. कच्या मालाच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. शिवाय डिझेलचे दर वाढत असल्याने वाहतुकीसाठीही अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. या महागाईमुळे आपोआपच उत्पादनाचे दरही वाढले आहेत. पण ग्राहकांची वाढीव दराने माल खरेदी करण्याची मानसिकता नाही. त्यामुळे जी चालना उद्योग- व्यवसायांना मिळायला पाहिजे ती अद्यापही मिळालेली नाही. उद्योजक या संकटाचा सामना करीत असतानाच दुसरीकडे मनपा प्रशासनाकडून वसुलीचा तगादा लावला जात आहे. किमान सर्वकाही पूर्वपदावर येईपर्यंत वसुली आकारण्यात येऊ नये अशी मागणी उद्योजक करीत आहेत.

महागाईमुळे लातूरमधील उद्योग-व्यवसायांना घरघर
यंदा मुबलक प्रमाणात पाणी, तरीही अडचणींचा सामना कायम -


लातूर एमआयडीसीला मांजरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. पण भूखंड वसुली, पाणी पट्टी वसुली यासाठी प्रशासनाकडून तगादा लावला जात आहे. गेल्या 6 महिन्यात उद्योग सुरू नसल्याने अनेकजण अडचणीत आहेत. अशातच सक्तीची वसुली होऊ नये अशी मागणी उद्योजक करीत आहेत.

महागाईमुळे लातूरमधील उद्योग-व्यवसायांना घरघर
लहान-मोठ्या उद्योगावरच मोठे उद्योग अवलंबून -


लातूर एमआयडीसीमध्ये अधिकतर उद्योग हे लघु आणि मध्यम आहेत. यावरच काही मोठे उद्योग अवलंबून असतात. पण वाढती महागाई, मजुरांचा प्रश्न यामुळे अजूनही उद्योग हे पूर्वपदावर आलेले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने सहकार्य करण्याची अपेक्षा उद्योजक व्यक्त करीत आहेत. कोरोना आणि त्यानंतरची महागाई यामुळे काही उद्योग हे बंद पडले आहेत.

Last Updated : Dec 14, 2020, 7:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details