लातूर - वृक्षलागवडीच्या अनेक मोहिमा राबवल्या जातात. पण, प्रत्यक्षात त्या कागदावरच राहतात. पण, लातूरमधील एका ग्रुपने लातूर हिरवेगार करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ निर्णयच नाही तर प्रत्यक्षात या मोहिमेला सुरुवात होऊन चार वर्षे उलटली असली तरी अजूनही यामध्ये सातत्य आहे. दुष्काळी जिल्हा म्हणून लातूरची असलेली ओळख पुसून टाकण्याचा निर्धार लातूर ग्रीन केला आहे. एवढेच नव्हे तर गेल्या वर्षभरात या ग्रुपच्या वतीने 40 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. निम्मे लातूर शहर झोपेत असताना या ग्रुपच्या सदस्यांचे हात राबत वृक्षलागवडीसाठी असतात.
रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आलेले शहर अशी ही लातूरची ओळख काही दिवस का होईना राहिलेली आहे. त्यानंतर अनेक मंत्रिमंडळाच्या बैठका लातुरात पार पडल्या. उजनीचे पाणी लातूरला आणण्यावरून राजकीय वातावरण ढवळूनही निघाले. मात्र, समस्या आजही कायम आहेत. पण, या सर्व गोष्टींचा मुळाशी जाऊन ग्रीन लातूरचा ग्रुप गेल्या 4 ते 5 वर्षांपासून काम करत आहे. शहरातील एक विशिष्ट परिसर ठरवला जातो. त्या ठिकाणी लागवड करण्याचे निश्चित केले जाते आणि दिवसउजडताच या ग्रुपमधील सर्व सदस्य हे एकवटले जातात. वृक्षलागवडीबरोबरच संवर्धनाचे अविरत काम सुरू आहे.