लातूर - 'सरकारी काम अन सहा महिने थांब' ही म्हण सर्वश्रूत आहे. मात्र, आता सहा ऐवजी वर्षभर थांब, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचे कारण सांगून सरकारी अधिकारी व कर्मचारी सामान्य नागरिकांची कामे करण्यास टाळाटाळ करत आहेत. अनलॉकमध्ये शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांनी शंभर टक्के हजेरी लावण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे.
लॉकडाऊनच्या काळात जनतेची कामे रखडलेली आहेत. 1 ऑगस्टपासून कर्मचाऱ्यांनी कार्यालयात शंभर टक्के हजर राहण्याचे आदेश सरकारचे आहेत. मात्र, लॉकडाऊनचे चार महिने आराम करूनही सरकारी यंत्रणेच्या कामकाजात ना कोणता उत्साह आहे ना सर्वसामान्यांविषयी आस्था. नागरिक कार्यालयाची पायरी चढला की, त्याला कोरोनामुळे काम बंद आहे, एवढेच सांगितले जाते. लातूरच्या तहसील कार्यालयात तर रेशन कार्ड, सातबारा उतारा, घरकुल योजनेचे अर्ज दाखल करण्यासाठी दिवसाकाठी हजारो नागरिक दाखल होतात. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेला आता कोरोनाची साथ मिळाल्याने कोणतीही कामे होत नाहीत.