लातूर- 2019 च्या खरीप हंगामातील तीन हेक्टरवरील सोयाबीनच्या पीक विम्यापोटी 2 हजार 500 रुपये अदा केले असता या बदल्यात औसा तालुक्याच्या मातोळा येथील शेतकरी गणेश भोसले यांना चक्क 54 हजार रुपये मिळाले होते. त्याअनुषंगाने शुक्रवारी 'मन की बात' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात या गणेश भोसले यांना संवाद साधता आला आहे. यामध्ये पीक विमा रकमेबरोबरच इतर शेती निगडित व्यवसायाशीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. 'मन की बात'मध्ये संवाद साधणारे गणेश भोसले यांच्याशी केलेली विशेष चर्चा...
दरवर्षी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. यामुळेच मातोळा येथील गणेश भोसले हे नियमित पीक विमा भरत होते. 2019 मध्येही अवकाळी पावसामुळे सोयाबीन या मुख्य पिकाचे नुकसान झाले. मात्र, त्यांनी 2500 रुपये भरून सोयाबीनचा विमा काढला होता. अवघ्या चार महिन्यांमध्ये त्यांना या बदल्यात 54 हजार रुपये मिळाले. त्या अनुषंगाने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद करत असताना त्यांनी राम-राम म्हणत आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवून दिले. पीक विमा रक्कम अदा करणे किती महत्त्वाचे आहे हे देखील पटवून दिले. शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड गणेश भोसले यांनी दिली आहे. त्यामुळे शेती फायद्याची का पशुपालन? असा प्रश्नही पंतप्रधान मोदी यांनी त्यांना विचारला. यावेळी दोन्ही व्यवसाय एकमेकांवर अवलंबून आहेत. शिवाय दोन्हीही फायद्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणे आपल्यासाठी सर्वोच्च आनंददायी बाब असल्याचे म्हणत भोसले यांनी आनंद व्यक्त केला. शिवाय प्रत्येक शेतकऱ्याने या पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.