लातूर - विधानसभा निवडणुकीचे मतदान चार दिवसांवर आल्याने मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांकाडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये प्रत्यक्ष मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यासाठी उमेदवारांचे कुटुंबीय प्रचाराच्या रिंगणात उतरल्याचे चित्र जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात आहे.
जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रमुख पक्षांतील उमेदवारांनी रात्रीचा दिवस करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून सिनेअभिनेता रितेश देमुख लातूर शहर आणि ग्रामीणमध्ये तळ ठोकून आहे. ग्रामीण भागात अभिनेत्याचे आकर्षण असल्याने याचा थेट फायदा नवखे उमेदवार धीरज देशमुख यांना होत आहे. या दोन्ही भावांसाठी आई वैशालीताई देशमुख यांनीही सभा तसेच महिलांच्या कॉर्नर बैठका घेण्यास सुरुवात केली.