लातूर - गणेशोत्सवाच्या काळात पावसाची कृपादृष्टी राहण्यासंबंधी आशावाद जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी उत्सव सुरू होण्यापूर्वीच्या शांतता समितीच्या बैठकीत केला होता. मात्र, पावसाची अवकृपा कायम राहिल्याने गणेश मूर्तींचे विसर्जन कुठे करायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासह पोलीस प्रशासनाने शहरातील गणेश मंडळाच्या अध्यक्षांची बैठक घेतली. यामध्ये घरगुती गणपतींचे विसर्जन घरातच करावे, तसेच मंडळांनी गणेश मूर्ती दान कराव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ 50 टक्के पाऊस झाला आहे. यामुळे नदी- नाले, विहिरी कोरड्या असून, लातूरकरांना 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे यंदा गणेश विसर्जन कुठे करावे, असा प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या समोर आहे. यापूर्वी शांतता समितीच्या बैठकीतही जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश मूर्तींचे दान करण्याचे आवाहन केले होते.
हेही वाचा लातुरात रेल्वेने पाणी आणल्याचे बील पालिकेच्या माथी, मदत केल्याचे बील कसे मागता - आमदार अमित देशमुख
यानंतर आता घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन घरातच करण्यासोबत सार्वजनिक मंडळांनी विसर्जनाच्या ठिकणी गणेश मूर्ती जमा करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच या मूर्त्या शहरातील मूर्तिकारांना दान केल्या जाणार आहेत.