लातूर- जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. संचारबंदीचा सहावा दिवस असून आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही. परंतु, जिल्हा प्रशासन कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
लातूर शहरात पोलीस प्रशासनासह मनपाचे अधिकारी रस्त्यावर उतरून शांतता आणि स्वच्छता या महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करीत आहेत. तर, दुसरीकडे ग्रामीण भागात ना नियमांचे पालन होत आहे. संचारबंदीच्या सुरुवातीच्या काळात असलेला शुकशुकाट आता पहायाला मिळत नाही.
जिल्ह्यातून आतापर्यंत ५५ कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ५० जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले, तर ५ जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. त्यामुळे ही दिलासादायक बाब असली तरी गेल्या पंधरा दिवसांमध्ये शहरामधून तब्बल २५ हजार नागरिक गावी दाखल झाले आहेत. या सर्वांचीच तपासणी झाली आहे असे नाही. गावोगावात पुण्या-मुंबईहून हजारोंच्या संख्येने दाखल झाले आहेत. याची नोंद घेण्यासाठी आशा वर्कर सर्वे करीत होत्या. परंतू, त्यांचेही काम अद्याप पूर्ण झालेले नाही.