लातूर - कोरोना काळापासून माथाडी कामगार संघटनेने आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडल्या आहेत. मात्र, याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आज माथाडी कामगार संघटनेच्यावतीने बंदची हाक देण्यात आली आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 800 हून अधिक कामगार बंदमध्ये सहभागी झाले असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत.
'या' मागण्यांसाठी केला आहे बंद -
मराठवाड्यात लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती महत्वाची बाजारपेठ आहे. येथे उस्मानाबाद, बीडसह कर्नाटक राज्यातूनही मोठ्या प्रमाणात शेती मालाची आवक असते. मात्र, गेल्या महिन्याभरात तब्बल तीन वेळा ही बाजार समिती बंद राहिली आहे. माथाडी कामगारांच्या कामात गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा शिरकाव होत आहे. यावर आळा घालावा, नाशिक येथील माथाडी कामगारांच्या लेव्हीचा प्रश्न मार्गी लावावा, माथाडी कामगारांना ये-जा करण्यासाठी रेल्वे पास मंजूर करावा, कामगारांच्या कर्जाच्या हप्त्याची माथाडी बोर्डाकडून कपात न होण्याबाबत विभागाने काढलेला आदेश रद्द करावा, माथाडी मंडळावर पूर्णवेळ चेअरमनची नेमणूक करावी, आशा ११ मागण्या माथाडी कामगार संघटनेने सादर केल्या आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बंद पुकारण्यात आला आहे.