लातूर - कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी चार पैसे मिळेल, या आशेने कामासाठी घरदार सोडून आलेले तब्बल पाच हजार कामगार लातुरात लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. यामध्ये शेजारील जिल्ह्यांसह परराज्यातील कामगारांचा समावेश आहे. त्यांची उदरनिर्वाहाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. मात्र, कर्ता पुरुषच येथे अडकल्याने त्यांच्या कुटुंबाची काय स्थिती असेल, याची काळजी कामगारांना लागली आहे. त्यामुळे आम्ही येथे असलो तरी कुटुंबाच्या काळजीने व्यथीत झालो असल्याची खंत या सर्व कामगारांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना व्यक्त केली.
हेही वाचा....''लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार"
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही अनेक कामगारांनी गाव गाठण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र, जिल्ह्याच्या सीमा सील केल्यानंतर लातूर जिल्ह्यात तब्बल 5 हजार कामगार अडकले आहेत. लातूरमध्ये एमआयडीसीचा मोठा विस्तार झाला आहे शिवाय बाजारपेठही मोठी असल्याने परिसरातील जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातील कामगारांची संख्या अधिक आहे. मात्र, संचारबंदी लागू झाली आणि सर्व व्यवसाय ठप्प झाले.