लातूर - महापुरुषांचे विचार केवळ भाषणांत आणि सामाजिक कार्यक्रमात ऐकावयास मिळतात. मात्र, जिल्ह्यातील देवणी येथील कुशावर्ता बेळे यांनी हे विचार प्रत्यक्षात उतरवून महिलांसाठी काम केले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी महिलांचे संघटन उभे केले आहे. शिवाय समुपदेशनाच्या माध्यमातून काडीमोड होणारे संसारही रोखले आहेत. गेल्या ३० वर्षापासून त्यांचे हे काम सुरू असून जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या कामाचा घेतलेला हा विशेष आढावा
कुशावर्ता यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. मूलभूत गरजाही मिळत नसल्याने शिक्षण तर लांबचाच विषय होता. मात्र, जिद्द, चिकाटी आणि महिला संघटनाचे कौशल्य लहानपापासूनच त्यांच्याकडे होते. त्यामुळेच रोजंदारीवर असतानाही त्यांनी महिलांचे संघटन उभे केले. बालपणाची असलेली आवड हेच त्यांचे भविष्यातील काम झाले. कुशावर्ता बेळे यांचे अवघ्या १२ व्या वर्षी बालविवाह झाला. मात्र, अशा परिस्थितीतही त्यांनी रात्रीच्या शाळेत जाऊन दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरकामांबरोबर महिलांबाबतचे काम पाहून त्यांना विविध संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. प्रत्येक संधीचे सोने केल्याने महिलांबाबतची तळमळ पाहून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, संजय दत्त यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
विविध संस्थांमध्ये काम केल्यानंतर १९९६ साली त्यांनी ग्रामीण महिला विकास संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत त्या बचत गटाचे आणि महिला सबलीकरणचे धडे देत आहेत. त्यांच्या या उपक्रमातून केवळ देवणी तालुक्यात ७५० बचत गट निर्माण करण्यात आले असून यामाध्यमातून हजारो महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. एवढेच नाही समुपदेशनातून हजारो जोडप्यांचे संसार सुरळीत झाले आहेत.