लातूर- दरवर्षी पावसाअभावी कोमेजून जाणारी खरिपातील पिके यंदा मात्र, अतिवृष्टीमुळे पाण्यातच आहेत. चार महिने तळहाताच्या फोडाप्रमाणे पिके जोपासली पण अंतिम टप्प्यात सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि उरलं- सुरलं परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. खरिपात सोयाबीनची 4 लाख 59 हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. पैकी 2 लाख 10 हजार क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्पादनाच्या दृष्टीने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम महत्वपूर्ण आहे, तर सोयाबीन हे त्यामधील मुख्य पीक. हंगामाच्या सुरुवातीला बियाणांची उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांना हजारो रुपये खर्ची करून दुबार पेरणी करावी लागली. पण, ही संकटाची मालिका कायम राहिली आहे. खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग ऐन शेवटच्या टप्प्यात असतानाच सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे या पिकांचे नुकसान झाले होते. या काळात 1 लाख 14 हजार हेक्टरावरील पिके बाधित झाल्याचा अहवाल पाठविण्यात आला आहे.