किल्लारी (लातूर) - 30 सप्टेंबर 1993ची पहाट लातूर कधीच विसरू शकणार नाही. गणपती विसर्जनानंतरचा तो दिवस होता. सबंध महाराष्ट्र साखरझोपेत असताना लातूर जिल्ह्यातील किल्लारी व आजूबाजूची गावे भूकंपाने क्षणात उद्ध्वस्त झाली. हजारो लोक झोपेतच गाडले गेले. ढिगाऱ्यांत अडकलेले मृतदेह, जखमी लोक, नातेवाईकांना शोधणारे ग्रामस्थ, मदत काम करणारे स्वयंसेवक, कोलमडलेले संसार हे चित्र अत्यंत विदारक होते. हाहाकाराची ही विदारकता काळीज पिळवटून टाकणारी होती. आज या घटनेला 28 वर्ष पूर्ण होत आहेत. भूकंपाच्या अडीच दशकानंतरची भूकंपग्रस्त भागातील मौजे कारला व कुमठा ही दोन गावे आजही पुरेशा मदतीपासून वंचित आहेत. या गावांच्या सध्यस्थितीचा 'ई-टीव्ही भारत'ने घेतलेला आढावा.
हेही वाचा -भूकंपाने हादरला हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्ह्यात केंद्र बिंदू, ४.४ तीव्रतेची नोंद
पुनर्वसनाची समस्या अद्याप कायम
लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील किल्लारी व परिसरातील हजारो घरे भूकंपात भुईसपाट झाली, उद्ध्वस्त झाली. जे बचावले ते सुदैवानेच. तर शेकडो जण जायबंदी झाले, त्यांना अपंगत्व आले. काही अनाथ झाले. किल्लारी व परिसरातील अनेक गावांचे शासनाने पुनर्वसन केले. परंतू किल्लारीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मौजे कारला व कुमठा या गावांची पुनर्वसनाची समस्या अद्याप कायम आहे.
चौदाशे उंबऱ्यांचे गाव
लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील मौजे कारला हे चौदाशे उंबऱ्यांचे गाव असून जवळपास पाच हजार नागरिकांचे येथे वास्तव्य आहे. तर मौजे कुमठा येथे साडे पाचशे घरे असून दोन हजार नागरिकांचे येथे वास्तव्य आहे. ही दोन्ही गावे किल्लारीपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. परंतू आज 28 वर्षानंतरही या दोन गावांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही.
अजूनही राहताहेत पडक्या घरात
मौजे कारला व कुमठा या दोन्ही गावात 1993च्या किल्लारी भूकंपाचे धक्के बसल्याने कोसळलेली घरे, वाडे, वास्तू आजही त्याच अवस्थेत आहेत. सन 2007मध्ये या गावांना पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्याने गावातील काही नागरिक शेतात जावून राहिली. अनेक नागरिक अजूनही भूकंपातील त्याच पडक्या घरात राहत आहेत.
हेही वाचा -भूकंपाने हादरला तुर्कस्तान... इमारती कोसळल्याचा भीषण व्हिडिओ
आश्वासनांवर बोळवण
शासनाने येथील नागरिकांना दोन टप्प्यात अर्थिक मदतही केली. नागरिकांनी या दोन गावांचे पुनर्वसन करावे, यासाठी शासन दरबारी दादही मागितली. परंतू पुढाऱ्यांनी केवळ आश्वासनावर बोळवण करत गावांच्या पुनर्वसनाची समस्या अद्याप कायम ठेवली असून आता शासनाने तत्काळ पुनर्वसन करून न्याय द्यावा, अशी भावना येथील नागरिकांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली आहे. राज्याचे भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे हे लातूरचे आहेत. आता त्यांनीच या समस्येचे गांभीर्य ओळखून कारला व कुमठा या दोन गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.