महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बंद करा आश्वासनांचा बाजार, स्टायफंड करा रुपये ५० हजार; लातुरात इंटर्न डॉक्टरांचे आंदोलन - Intern doctor Latur demand salary increase

'बंद करा आश्वासनांचा बाजार, स्टायफंड करा ५० हजार, जीव वाचविणाऱ्याच्या जिवावर उठू नका, 'आमचा वाली कोण?' यासह इंटर्न (आंतरवासिता) डॉक्टरांनी दिलेल्या विविध घोषणांनी स्व. विलासराव देशमुख शासकीय विज्ञान व संशोधन संस्था, लातूरचा परिसर दणाणून गेला.

Intern doctor Latur demand salary increase
विद्या वेतन वाढ मागणी इंटर्न डॉक्टर लातूर

By

Published : May 9, 2021, 8:38 PM IST

लातूर - 'बंद करा आश्वासनांचा बाजार, स्टायफंड करा ५० हजार, जीव वाचविणाऱ्याच्या जिवावर उठू नका, 'आमचा वाली कोण?' यासह इंटर्न (आंतरवासिता) डॉक्टरांनी दिलेल्या विविध घोषणांनी स्व. विलासराव देशमुख शासकीय विज्ञान व संशोधन संस्था, लातूरचा परिसर दणाणून गेला. ५० हजार रुपये विद्यावेतन देण्यासह अन्य मागण्यांसाठी इंटर्न डॉक्टरांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू करत कोविड वॉर्डात रुजू होण्यास नकार दिला.

माहिती देताना इंटर्न डॉक्टर

हेही वाचा -लातूरामध्ये आजपासून 6 दिवसांचा कडक लॉकडाऊन; शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट

लातूर येथील 154 इंटर्न (आंतरवासिता) डॉक्टरांची कोविड वॉर्डात ड्युटी लावण्यात आली आहे. त्यांना 10 हजार 800 रुपये मानधन दिले जाते. परंतु, हे मानधन अत्यंत कमी असल्याने इंटर्न डॉक्टरांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले.

मुंबई महापालिकेने तेथील इंटर्न डॉक्टरांना दरमहा ५० हजार रुपये कोरोना मानधन दिले आहे. ११ हजार रुपये इतक्या विद्यावेतनाशिवाय अतिरिक्त कोरोना भत्ता देण्यात आला. याच धर्तीवर वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथील इंटर्न डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले.

इंटर्न डॉक्टरांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात यावे, कोविड ड्युटीदरम्यान राहण्याची आणि त्यानंतर क्वॉरंटाईनची व्यवस्था करावी, आजारी पडल्यास उपचाराची जबाबदारी शासनाने घ्यावी, या प्रमुख मागण्यांचे निवेदन इंटर्न डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने शासनाकडे दिले.

गेल्या वर्षभरापासून वरिष्ठ इंटर्न डॉक्टरांकडून या प्रमुख मागण्या केल्या जात होत्या. परंतु, शासनाने याची वेळीच गंभीर दखल घेतली नाही. आता जोपर्यंत शासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कोविड वॉर्डात एकही इंटर्न डॉक्टर रुजू होणार नाही, असे निवेदनात नमुद आहे.

लातुरातील इंटर्न डॉक्टरांच्या आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून मागण्या मान्य करण्याचे सांगत समजूत काढली. परंतु, इंटर्न डॉक्टर आपल्या निर्णयावर ठाम राहिले. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हेच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. कोरोना काळात रुग्णसेवेत इंटर्न डॉक्टरांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्याही लक्षणिय आहे. या पार्श्वभूमीवर आज लातूरच्या शासकीय रुग्णालयाच्या सर्वच 154 इंटर्न डॉक्टरांनी कोरोना वॉर्डात कामावर रुजू न होण्याचा निर्णय घेवून काम बंद आंदोलन केल्याने शासकीय रुग्णालय प्रशासनाच्या समोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

हेही वाचा -लातूरच्या आयकॉन रुग्णालयाचा बेजबाबदारपणा; टाकाऊ साहित्य टाकले उघड्यावरच

ABOUT THE AUTHOR

...view details