लातूर - राज्यात सर्वत्र पाऊस सक्रिय आहे. मुंबई - पुण्यात धुवांधार सुरु आहे. एवढेच नाहीतर मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र लातूरकडे पावसाने पाठ फिरवली आहे. लातूरला आतापर्यंत केवळ 70 मिमी पाऊस बरसला असून तो एकूण सरासरीच्या 10 टक्के एवढाच आहे. त्यामुळे खरिपातील पेरण्या खोळंबल्या असून पेरण्या झालेले क्षेत्रही धोक्यात आहे. परिणामी भर पावसाळ्यातही लातूरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.
लातूर जिल्ह्याकडे पावसाची पाठ; शेतकरी चिंतातूर - पाऊस सक्रिय
मुंबई - पुण्यात धुवांधार सुरु आहे. एवढेच नाहीतर मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र लातूरकडे पावसाने पाठ फिरवली आहे. लातूरला आतापर्यंत केवळ 70 मिमी पाऊस बरसला असून तो एकूण सरासरीच्या 10 टक्के एवढाच आहे.
गतवर्षी पावसाने अवकृपा दाखवल्याने किमान यंदातरी भरघोस उत्पादन पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी सज्ज झाला होता. प्रतिकूल परिस्थितीमधेही खरिपाच्या अनुषंगाने मशागतीची कामे उरकती घेऊन शेतकऱ्यांना आस पावसाची होती. मात्र, गेल्या महिन्याभरापासून एकही समाधानकारक पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे विकतचे बी-बियाणे जमिनीत गाडण्यापेक्षा शेतकऱ्यांनी पावसाची प्रतीक्षा करणे योग्य मानले. मात्र, आता पेरा उशिरा झाला तर त्याचा परिणाम उत्पादनावर होईल या भीतीने शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली. मात्र वरूणराजाची अवकृपा कायम आहे. त्यामुळे यंदाही खरीप हातचे जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. एवढेच नाहीतर पिण्याच्या पाण्यासाठी लातूरकरांची भर पावसाळ्यात भटकंती होत आहे.