लातूर -लातूरच्या एमआयटी मेडीकल कॉलेजचा कोरोनाबाधित विद्यार्थी डॉ. राहुल पवारच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. याबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी निर्देश दिले आहेत. राहुल पवार हा 'एमबीबीएस'च्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याच्यावर औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून राहुल पवार याच्या उपचारावरील खर्च राज्य सरकार करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
राहुल पवार हा परभणी जिल्ह्यातील मौजे लिंबा ता.पाथरी येथील रहिवाशी आहे. त्याचे आई-वडील ऊसतोड मजूर आहेत. राहुल हा या गावातून तयार होणारा पहिलाच डॉक्टर आहे. एप्रिल महिन्यात परीक्षेची तयारी करत असताना त्याला कोरोनाची लागण झाली, परीक्षेनंतर त्यांने कोरोना चाचणी केली. मात्र तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्याला औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आई-वडील आहेत ऊसतोड मजूर
त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीब आहे, आई-वडील व छोटा भाऊ असे त्याचे कुटुंब आहे. आई-वडील ऊसतोड कामगार आहेत. छोटा भाऊ सचिन 10 विच्या वर्गात शिकत आहे. तोही आई-वडिलांना ऊस तोडण्याच्या कामामध्ये मदत करतो. राहुलच्या उपचाराचा खर्च लाखो रुपयांचा असल्याने सुरुवातील कर्ज काढून आई-वडिलांनी उपचार केला. परंतु दिवसेंदिवस खर्च वाढतच होता, उपचारादरम्यान त्यास म्युकरमायकोसिस आजाराचा संसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे राहुलच्या नातेवाईकांनी 'ई-टीव्ही भारत'कडे मदत मागितली. 'ई-टीव्ही भारत'ने याबाबत दिनांक 18 मे,2020 रोजी 'ऊसतोड कामगाराचा मुलगा डॉ.राहुल पवारची मृत्यूशी झुंज सुरुच' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. तसेच मदतीचे देखील आवाहन केले होते. या बातमीचा परिणाम म्हणून दोन दिवसांत राहुलच्या नातेवाईकांच्या खात्यात तब्बल 2 लाख 76 हजार रुपयांची आर्थिक मदत जमा झाली होती.