लातूर - गंजगोलाई ही शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. शुक्रवारी सायंकाळी 6 च्या दरम्यान येथील गोयल एंटरप्राइजेसच्या चार मजली इमारतीला आग लागली. वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तीवला जात आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकणी गंजगोलाईची बाजारपेठ आहे. येथील गोयल एंटरप्राइजेसच्या इमारतीमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. सायंकाळी 6 च्या दरम्यान या इमारतीमधून आगीचे लोट बाहेर पडू लागले. इमारतीमध्ये ऑईलपेंट असल्याने या आगीने चार मजली इमारत कव्यात घेतली. आग विझवण्यासाठी 4 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. असे असतानाही आग आटोक्यात येत नसल्याने औसा, उस्मानाबाद, बीड या ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या गाड्या मागवून घेण्यात आल्या आहेत. रात्री 7 पर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केले आहे. गंजगोलाईकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे, तर जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा भाग खूपच चिंचोळा असल्याने आग विझवण्यात अडचणी निर्माण होत आहेत. मनपाचे कर्मचारी, पोलीस अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून आहेत. असे असले तरी आग आटोक्यात येईल अशी स्थिती सध्या तरी नाही.