लातूर -किरकोळ कारणासाठीही लाचेची मागणी केली जात आसल्याचे प्रकरण समोर आले आहे. लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस असे प्रकार वाढत असून एक पोलीस कर्मचारी शहरातीलच रेणापूर नाका येथे ड्यूटी करण्यास मदत करतो. याकरता वरिष्ठांना तीन हजार रुपये देण्याची सांगत लाचेची मागणी करणारे होमगार्ड एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ सापडले आहेत. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे.
तीन हजाराची लाच घेणारा होमगार्ड एसीबीच्या जाळ्यात; कर्तव्य बजावले त्याच ठाण्यात चौकशीची नामुष्की - Lakshman Raje in ACB trap
प्रशासकीय अधिकारी वेगवेगळ्या कारणासाठी लाचेची मागणी करीत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येतात. पण एकाच खात्यामध्ये कर्तव्य बजावत असलेल्या होमगार्डने केवळ ड्युटी लावण्यासाठी लाच मागितली असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ज्या शिवाजीनगर ठाण्यात आरोपी लक्ष्मण राजे हे कर्तव्य बजावत होते, त्याच ठाण्यात त्यांना चौकशीला सामोरे जावे लागले आहे. लाचेची रक्कम अधिक नसली तरी यामुळे खाकी डागळली असल्याची चर्चा सुरू आहे.
![तीन हजाराची लाच घेणारा होमगार्ड एसीबीच्या जाळ्यात; कर्तव्य बजावले त्याच ठाण्यात चौकशीची नामुष्की तीन हजाराची लाच घेणारा होमगार्ड एसीबीच्या जाळ्यात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9816807-15-9816807-1607497697350.jpg)
मोक्याच्या ठिकाणी ड्यूटीसाठी खटपट
शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी याकरिता रेणापूर नाका तसेच शहरातील विविध भागात पोलीस कर्मचारी यांची नेमणूक केली जाते.पण यामागेही किती घडामोडी घडतात याचे उदाहरण समोर आले आहे. केवळ रेणापूर नाका येथे ड्युटी लावतो याकरिता होमगार्ड लक्ष्मण राजे (36) यांनी चक्क त्यांच्याच सहकाऱ्याला 3 हजार रुपयांची लाच मागितली. एवढेच नाही तर मेजर पोलीस गवारे यांना ही रक्कम द्यावी लागत असल्याचे त्यांनी तक्रारदार यास सांगितले. शिवाय होमगार्ड, मेजर आणि तक्रारदार पोलीस कर्मचारी हे शिवाजीनगर ठाण्याअंतर्गतच कर्तव्य बजावतात. मात्र, कर्तव्य बाजावण्याच्या ठिकाणावरूनही असे प्रकार घडतात हे समोर आले आहे. ठरल्याप्रमाणे रेणापूर नाका येथे लाचेची रक्कम स्वीकारत असताना होमगार्ड लक्ष्मण राजे यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. मंगळवारी रात्री 8 च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. ज्या शिवाजीनगर ठाण्यात होमगार्ड लक्ष्मण राजे हे कर्तव्य बजावत होते, त्याच ठाण्यात त्यांना चौकशीसाठी हजर राहावे लागले होते. पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक माणिक बेद्रे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.