लातूर - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे अनेक ठिकाणी नागरिक गरजूंना अन्नधान्य वाटप करत आहेत. याचसोबत हॅपी इंडियन व्हिलेज (एचआयव्ही) या सेवालयातील मुले सध्या मास्क बनवण्यासाठी राबत आहेत. या सेवालयातील एचआयव्ही संक्रमित मुला-मुलींना ज्या वैद्यकीय महाविद्यालयातून दरमहा गोळ्या औषधं मिळतात, त्याच महाविद्यालयातील डॉक्टर्स आणि नर्सेस यांना ५०० मास्क देऊन या बालकांनी कृतज्ञता व्यक्त केलीय.
स्वत:च्या भविष्याबद्दल अज्ञात असलेले हात इतरांच्या भवितव्यासाठी राबतात तेव्हा... हेही वाचा-#Corona: कल्याण-डोंबिवलीत आणखी तीन रुग्ण; सहा महिन्यांचे बाळही 'पॉझिटिव्ह'
कोरोनाचे संकट तात्पुरते असले, तरीही औसा तालुक्यातील हासेगाव येथील हॅपी इंडियन व्हिलेजमधील मुलं-मुलींना जडलेला आजार कायम आहे. जन्मताच सकारात्मक दृष्टीकोन घेऊन जीवन जगत असलेल्या या मुलांनी आता याच हॅपी इंडियन व्हिलेजमध्ये रवि बापटले यांच्या माध्यमातून संसार उभे केले आहेत. सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्याचे या वेळेचा योग्य वापर करण्याचा निर्धार सेवालयाचे संस्थापक रवि बापटले यांनी केला.
गरजूंना मदत व्हावी, या उद्देशाने २५ हजार मास्क बनवण्याचे काम विद्यार्थ्यांनी हाती घेतले. सेवालयातील विद्यार्थ्यांना दरमहा लागणारी औषधे वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात येतात. रात्री-अपरात्री उपचारासाठी याच रुग्णालयात मुलांना दाखल केले जाते.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांनी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेसला ५०० मास्क देऊ कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी औसा तहसील कार्यालय, तालुका आरोग्य केंद्र व तालुक्यातील चार पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनादेखील ५०० मास्क दिले आहेत.