लातूर - निलंगा तालुक्यातील औराद शाहजनी येथे सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे अनेक घरात आणि दुकानात पाणी घुसले आहे. त्यामुळे व्यावसायिक आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे. आज दुपारी ढगफुटी सदृष्य झालेल्या पावसामुळे औरादपासून दोन किलोमीटर अंतरावर जामखंडीकडे जाणारा पुल पाण्याखाली गेला. तर, याच पुलावरून जात असलेला ट्रक पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पलटी झाला.
औराद शाहजनीत पावसाचं थैमान; १२० मीमी पावसाची नोंद, पुलावरील पाण्यामुळे ट्रक पलटी - latur rain 2020 news
आज दुपारच्या सुमारास औराद शाहजनी भागात झालेल्या ढगफुटी सदृष्य पावसामुळे गावासह शेतात व उभ्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. तर, औरादपासून दोन किलोमीटर अंतरावर जामखंडीकडे जाणारा पुल पाण्याखाली गेला तर, याच पुलावरून जात असलेला ट्रकदेखील पाण्याचा अंदाज न आल्याने पलटी झाला.
लातूर-जहिराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्यातील खोदकामामुळे या मार्गावर अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यात पाऊस पडला की वाहनधारकांना चिखलात मार्ग शोधावा लागतो. दरम्यान, बुधवार पाठोपाठ आज गुरुवारीही पावसाने हजेरी लावली. यातच औराद शाहजनी ते तागरखेडा या गावादरम्यानचा ओढा दुथडी भरून वाहत असल्याने दोन्ही गावचा संपर्क तुटला आहे. आतापर्यंत मराठवड्यात सर्वात कमी पाऊस हा लातूर जिल्ह्यात झाला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर, काही भागात मुसळधार पाऊस होत असल्याने खरीपाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -लातूरच्या औराद शाहजनीत पाणीच पाणी; सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा कहर