लातूर - यंदा हंगामाच्या सुरूवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीला वेग आला असून, बळीराजा सुखावला आहे. सोमवारी दुपारी लातूर शहरासह तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने रस्त्यावर पाणीच-पाणी साचले होते. त्यामुळे मनपाने केलेल्या दाव्याची पोलखोल झाली आहे.
लातुरात पावसाची जोरदार बॅटिंग, खरिपाच्या पेरणीला वेग - लातुरात खरीप हंगामाला सुरुवात
हंगामाच्या सुरूवातीलाच लातूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीला वेग आला असून, बळीराजा सुखावला आहे.
लातूर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 5 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीला सुरूवात झाली असून, पोषक वातावरण झाले आहे. खरिपात सोयाबीन महत्वाचे पीक असून यंदाही सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात दररोज पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी दुपारी तर आर्धा तास झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. मान्सूनपूर्व कामे झाली असल्याचा दावा मानपाकडून केला जात असला तरी वास्तव काय आहे याचा अनुभव लातूरकरांनी घेतला आहे.
गावभागातील गल्ली-बोळात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले होते. तर अनेकांच्या घरातही पाणी शिरले होते. शिवाय वाहनधारकांना मार्गस्थ होण्यासाठी कसरत करावी लागत होती. गेल्या आठ दिवसातील हा सर्वात मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगामात सर्वकाही सुरळीत होईल असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.