लातूर -ग्रामीण भागात कुपोषित बालकांची संख्या वाढत असल्याने बाळांच्या आईलाच पोषण व सकस आहाराची गरज आहे. याकरता एकात्मिक बालविकास सेवा योजना पोषण आहार व आकार साहित्य प्रदर्शन घेण्यात आले.
जळकोट शहरात श्री गुरुदत्त सप्ताह सोहळ्यानिमित्त पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वतीने पोषण आहार व आकार साहित्य प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनात जळकोट तालुक्यातील ३ विभागाच्या ११६ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बनवून आणलेल्या पोषण व सकस आहाराच्या २०० थाळ्या ठेवण्यात आल्या आहेत.
प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या थाळ्यांची तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात आली. यात वांजरवडा विभागाच्या थाळ्यांची पहिला क्रमांकावर निवड झाली आहे. तर, जळकोट विभागाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. अंगणवाडी सुपरवायझर आशा नादरगे म्हणाल्या ० ते ६ वर्षांपर्यंतच्या मुलांना असा आहार देणे खूप गरजेचे आहे. असा सकस आहार प्रत्येक गर्भवती महिलेने घरच्या घरी बनवून वेळेवर घेतल्यास जन्माला येणारे बाळ निरोगी, सुदृढ व कुपोषण मुक्त होईल. त्यामुळे असे प्रदर्शन घेऊन ग्रामीण भागातील महिलांना जागरूक करण्याची गरज असून यासाठी हे प्रदर्शन घेण्यात आले आहे असे त्या म्हणाल्या.