लातूर- विलासराव देशमुख यांनी ज्याप्रमाणे लातूरकरांची काळजी घेतली, त्याप्रमाणेच विलासराव देशमुख आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील डॉक्टर गेल्या 7 वर्षांपासून लातूरकरांची सेवा करत आहेत. त्यामुळे विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त 200 खासगी रूग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वैशाली देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विलासराव देशमुख स्मृतिदिनी 200 रुग्णालयात आरोग्य शिबीराचे आयोजन - तपासणी आणि उपचार
बुधवारी 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत तपासणी आणि त्यानंतर उपचार, अशी प्रक्रिया पार पडणार आहे.
गेल्या 7 वर्षापासून इंडियन मेडिकल असोसिएशन, डेंटल असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेतले जात आहे. वर्षानुवर्षे या शिबिरात लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गतवर्षी 20 हजार पेक्षा अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला होता. विलासराव देशमुख यांनी आयुष्यभर जनसेवा केली त्यामुळे त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा लोकपयोगी कार्यक्रम हाती घेतल्याचे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अजय जाधव यांनी सांगितले.
आर्थिक क्षमता नसलेल्या रुग्णांना सर्व प्रकारच्या तपासण्या करून घेण्यासाठी हे शिबीर लाभदायी ठरणार आहे. जिल्ह्यातील डॉक्टरांनी खासगी रुग्णालयात शिबीर घेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे डॉक्टरांचे व्यक्तिशः लक्ष राहते शिवाय गैरसोय टाळता येते. गेल्या महिनाभरापासून या शिबिराची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन वैशाली देशमुख यांनी केले आहे. यावेळी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तथा शहरातील अनेक डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.