लातूर - लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून 'बाला' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. हरंगुळच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रकाश फुलचंद जाधव यांनी आपल्या शाळेत हा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच यशस्वी केला आहे.
प्रतिक्रिया देताना शिक्षक प्रकाश फुलचंद जाधव हेही वाचा -अखेर 'फिनॉमिनल हेल्थ'चा म्होरक्या लातूर पोलिसांच्या जाळ्यात, मुंबई विमानतळावरून केली अटक
'बाला' हा शैक्षणिक उपक्रम आहे. निरीक्षण क्षमता, कल्पना आणि तर्क क्षमतेचा सुरेल संगम म्हणजे 'बाला'. बाला म्हणजे BALA : Building As Learning Aid अर्थात इमारतीचा शैक्षणिक कार्यासाठी उपयोग होय.
'बाला' हा उपक्रम राबविणारी लातूर जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद आहे. आणि जिल्हा परिषद शाळा हरंगुळ (खुर्द) ही शाळा बाला उपक्रम राबविणारी जिल्ह्यातील पहिली शाळा आहे. लातूर शहरापासून नजिक असलेल्या हरंगुळच्या (खु) या शाळेतील शिक्षक प्रकाश फुलचंद जाधव यांचे बाला उपक्रमासह विविधांगी शैक्षणिक कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यालाही दर्जेदार शिक्षणासह त्याचा सर्वांगीण विकास करण्याचा मानस उराशी बाळगून राष्ट्रकार्यात मश्गुल झालेले प्रकाश जाधव एक आदर्श शिक्षक आहेत. मागील 20 वर्षांपासून ते अध्ययन व अध्यापनाच्या प्रक्रीयेत कार्यरत आहेत. विविध कारणांसाठी त्यांना आजतागायत तब्बल 84 विविध पुरस्कार प्राप्त आहेत. केवळ शैक्षणिकच नव्हे तर, विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात.
प्रकाश जाधव यांनी संगीत, कला, क्रीडा यासह वैज्ञानिक दृष्टीकोण विकसित व्हावा या करिता आपल्या विद्यार्थांना विविध स्पर्धांसाठी घडवले व जिंकले सुद्धा आहे. शिवाय 19 व्या राष्ट्रीय बालमहोत्सवात त्यांच्या नेतृत्वात विद्यार्थांनी केलेली यशस्वी कामगिरी उल्लेखनीय आहे.
'बाला' हा उपक्रम लातूर जिल्ह्यातील पाचशे जिल्हा परिषदेच्या शाळेतून राबविण्यात येत आहे. परंतू सर्वाधिक लोकवाटा मिळवून विकास करणारी हरंगुळची (खु) जिल्हा परिषद शाळा जिल्ह्यात एकमेव आहे. शालेय परिसरातील प्रत्येक वस्तू किंवा शाळेचा भाग हा शैक्षणिक साधन म्हणून उपयोगात आणणे हाच 'बाला' उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
बाला उपक्रमांतर्गत शालेय बांधकाम, रंगरंगोटी, शाळा परिसर, नाविन्यपूर्ण उपक्रम व समाज सहभाग या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. या शाळेत प्रकाश जाधव व त्यांच्या सहकार्यांनी विद्यार्थ्यांना रोजगारक्षम शिक्षणाचे धडे देण्यास प्राधान्य दिले असून येथील विद्यार्थी एखाद्या इमारतीच्या बांधकामाचा नकाशा अगदी अचुकपणे तयार करतात. शाळेत 'मल्टी स्कील लॅब'ची स्थापना केली आहे.
बाला हा उपक्रम सुरुवातीला प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी दोन शाळा मोडेल स्कूल म्हणून विकसित करण्याचा मानस होता. परंतु, लातूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या प्रेरणेतून व गावकऱ्यांच्या सहभागातून तब्बल 182 शाळांमधून हा उपक्रम सध्या राबविण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेचे रुपडे बदलले असून शाळेच्या सौंदर्यात अधिक भर पडल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
हेही वाचा -उदगीरच्या नगरसेविकेच्या नवऱ्याचा पराक्रम; बलात्कारानंतर पुन्हा विनयभंग, दोनदा अटक