लातूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. असे असतानाही गुटखाविक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अहमदपूर तालुक्यातील सांगवी येथे नाकाबंदी दरम्यान ट्रकद्वारे गुटख्याची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. यामध्ये तब्बल २० लाखांचा गुटखा पोलिसांनी पकडला आहे.
अहमदपूरात २० लाखांचा गुटखा जप्त; नाकाबंदीवर पोलीसांची कारवाई
अहमदपूर तालुक्यातील सांगवी येथे नाकाबंदी दरम्यान ट्रकद्वारे गुटख्याची वाहतूक केली जात असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले होते. यामध्ये तब्बल २० लाखांचा गुटखा पोलीसांनी पकडला आहे.
नाकाबंदी सुरू असली तरी रात्री-अपरात्री माल वाहतूक करण्यास सोपे असते, हे जाणून एक गुटख्याचा ट्रक जिल्ह्यात दाखल होत होता. अहमदपूर तालुक्यातील सांगवी फाटा येथून मार्गस्थ होणारा ट्रक कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आला. अधिक तपास केला असता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा तब्बल २० लाखाचा गुटखा आढळला. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथून हा गुटखा लातूर जिल्ह्यात दाखल केला जात होता. मात्र, पोलीस कर्मचारी राठोड, तांबरे, देशमुख, गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे हा अवैध गुटखा पकडण्यात यश आले आहे.
यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे विठ्ठल लोंढे, स.पो.नि. केदार यांनी पंचनामा केला. शिवाय वाहतूक करणारा ट्रकही ताब्यात घेण्यात आला आहे. पोलीस अधिकारी विठ्ठल लोंढे यांच्या फिर्यादीवरून उमरगा तालुक्यातील सुनील सुतार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.