लातूर -शहरासह उदगीर तालुक्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील रुग्णांची संख्या आणि लगतच्या तालुक्यांचा विचार करता या ठिकाणी कोरोना टेस्टची प्रयोगशाळा उभारणे आवश्यक आहे. या करिता आरोग्य विभागाने प्रस्ताव पाठवावा. शासन स्तरावर पूर्तता केली जाणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे. उदगीर, जळकोट, देवणी या तालुक्यातील वाढती रुग्णांची संख्या पाहता उपाययोजना संदर्भात रविवारी आढावा बैठक पार पडली.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण हा उदगीर येथेच आढळून आला होता. शहरात एकूण रुग्णांची संख्या 621 एवढी झाली आहे. उदगीर येथे सामान्य रुग्णालय असून लातूर पाठोपाठ या ठिकाणच्या रुग्णालयात कोरोना रुग्ण दाखल केले जात आहेत. त्यामुळे शहरासह लगतच्या तालुक्यातील रुग्णांची संख्या पाहता येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या सभागृहात आढावा बैठक पार पडली. वाढती रुग्णसंख्या पाहता विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा उभारण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभाग आणि प्रशासनाने प्रस्ताव पाठवावा. त्याला मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री यांनी दिली आहे. 621 रुग्णापैकी आतापर्यंत येथील सामान्य रुग्णालयात 34 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.