लातूर - जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र अशा परिस्थितीत लातूर तालुक्यातील शिवणी बॅरेजचा दरवाजा अचानक उघडल्याने या प्रकल्पातील पाणी वाहून गेले. पावसाच्या पाण्याने हा प्रकल्प तुडुंब भरला होता. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक पाणी साचल्याने दरवजा उघडण्यात आला, तो तांत्रिक बिघाडाने बंदच झाला नाही. परिणामी लाखो लिटर पाणी वाया गेले असून यासंबंधी 'ईटीव्ही भारत' सर्वात प्रथम वृत्त प्रकाशित केले होते. याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना दिले आहेत.
लातूर तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे सर्वच पाटबंधारे प्रकल्पात पाणीसाठा झाला आहे. मात्र, मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे मांजरा नदीपात्रातील पाणी वाढले. त्यामुळे शिवणी बॅरेजमध्ये अधिकचा पाणीसाठा झाल्याने स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला होता. मात्र, तो वेळेत बंद न केल्याने या बॅरेजमधील पाणी वाहून गेले आहे. एकीकडे पाणी साठवणुकीसाठी जिल्हा प्रशासन सर्वकष प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडून असा प्रकार समोर आला आहे. याची माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांना मिळताच त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.