महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'वर्षभर संकटाचा सामना; मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही सरकार विकास कामांसाठी कटिबद्ध' - sanjay bansode talk about government latur

महाविकास आघाडी सरकारला सत्ता स्थापन करून वर्ष पूर्ण होत आहे. ज्या नाट्यमय स्थितीमध्ये सरकार स्थापन झाले होते अगदी तसाच काहीसा प्रवास उदगीर मतदारसंघाचे आमदार तथा राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा राहिला आहे. एक कार्यकर्ता ते थेट राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे.

Minister of State Sanjay Bansode
राज्यमंत्री संजय बनसोडे

By

Published : Nov 21, 2020, 4:51 PM IST

लातूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच असाध्य गोष्ट आज साध्य झाली आहे. उदगीर मतदारसंघातील जनतेने राष्ट्रवादीला कौल देऊन सेवा करण्याची संधी दिली. वर्षभर कोरोना, नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही सरकार विकास कामांसाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासोबत 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी यांनी साधलेला संवाद.

मतदारसंघात 350 कोटींची कामे -

महाविकास आघाडी सरकारला सत्ता स्थापन करून वर्ष पूर्ण होत आहे. ज्या नाट्यमय स्थितीमध्ये सरकार स्थापन झाले होते. अगदी तसाच काहीसा प्रवास उदगीर मतदारसंघाचे आमदार तथा राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा राहिला आहे. एक कार्यकर्ता ते थेट राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. कोरोनाचा सामना करण्यात राज्य सरकारचे वर्ष गेले आहे. शिवाय विकास कामावरील निधी कोरोनाच्या उपाययोजना करण्यासाठी खर्च करावा लागला. अशा परिस्थितीतही उदगीर मतदारसंघात 350 कोटी रुपयांची कामे होत असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. शिवाय भविष्यातील विकास कामाचे काय व्हिजन असणार आहे? हे देखील त्यांनी स्पष्ट केले.

आणखी इतर समस्या आहेतच...

एक ना अनेक घडामोडी घडल्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले होते. यामध्ये उदगीर मतदारसंघातून प्रथमच निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांना राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात उदगीर येथील प्रशासकीय कार्यालयांच्या इमारतीचे बांधकाम एकाच ठिकाणी करण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे नागरिकांची परवड रोखली जाणार असून एकाच छताखाली सर्व कामे होणार आहे. हा महत्त्वाचा विषय मार्गी लावण्यास बनसोडे यांना यश मिळाले आहे. मात्र, लातूर-नांदेड रस्त्याची दुरवस्था, लातूर शहराला उजनी धरणाचे पाणी हे प्रश्न कायम राहिले आहेत.

तर लातूर-नांदेड या रस्त्याच्या उभारणीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांमध्येच या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. रस्त्याची पूर्ण चाळणी झाली असून दुचाकी धारकांनाही मार्गस्थ होता येत नाही, अशी या रस्त्याची अवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. उजणीचे पाणी हे तांत्रिक कारणामुळे अडकले आहे. उजनी धरण हे कृष्णा खोऱ्यात आहे तर लातूर शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण गोदावरी खोऱ्यात आहे. यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, वॉटर ग्रीडच्या माध्यमातून उजणीचे पाणी मांजरा धरणात तसेच उस्मानाबादलाही पुरविले जाणार आहे. त्याअनुषंगाने कॅबिनेट बैठकीत मंजूरीही मिळाली आहे. सध्या कोरोनामुळे हे काम रखडले आहे. कोरोनाचे सावट दूर होताच पाठपुरावा केला जाणार आहे. याकरिता पालकमंत्री अमित देशमुख आणि मी कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले.

सरकारमध्ये राष्ट्रवादीला महत्व तर लातूर जिल्ह्यात पीछेहाट का?

सरकार स्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे सत्तेत आणि राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीला एक वेगळे महत्त्व आहे. मात्र, लातूर जिल्ह्यात काँग्रेसमुळे त्यांचा प्रभाव कमी होत चालला आहे. तर राष्ट्रवादीचे महत्त्व जर कमी असते तर उदगीर मतदार संघातून विजयीच झालो नसतो, असे मतही बनसोडे यांनी व्यक्त केले. राज्याच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार काम करीत आहे. त्यांच्याकडे दूरदृष्टी असून त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. वर्षभर कोरोनाचा सामना आणि खरिपात पावसाने झालेले नुकसान या दोन्ही गोष्टी सवरण्याचे आव्हान सरकार समोर होते. मात्र, यातून मार्ग काढत दोन्ही संकटावर मात केली आहे. भविष्यात उर्वरित विकासकामे मोठ्या झपाट्याने केली जाणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details