लातूर -वेळ कुणाला सांगून येत नाही.... पण एवढीही दुर्दैवी येऊ नये की, वडिलांचा मृतदेह समोर असतानाही परीक्षा देण्याची परिस्थिती ओढवावी... असाच प्रकार औसा तालुक्यातील बोरगाव नाकुलेश्वर गावात घडलाय. हृदविकाराच्या झटक्याने वडिलांचा मृत्यू झाला आणि दहावीची बोर्डाची परीक्षा देत असलेल्या शीतलसमोर दुःखाचा डोंगर उभा राहिला. अशा स्थितीमध्येही तिने दुःख आवरत परीक्षा केंद्राची पायरी चढली आणि पेपर देऊन आल्यानंतर वडिलांचा अंत्यविधी केला.
मूळची बोरगाव नकुलेश्वर असलेली शीतल रोंगे ही औसा येथील भारत विद्यालयात आहे. दहावी बोर्ड परीक्षेसाठी तिचा नंबर एकुर्गा येथील केंद्रावर आला होता. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तिचे वडील हे घरातील शेळ्यांना बाहेर काढत होते. त्या वेळी, त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते जमिनीवर कोसळले. हृयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ध्यानी-मनी नसलेली गोष्ट झाल्याने घरतल्या कुणालाच काही सुचेना. यातच शीतलचा इंग्रजीचा पेपर होता. त्यामुळे पेपरला जावे तरी कसे प्रश्न तिच्यासह घरच्यांसमोर होता. मात्र, शेजारी आणि नातेवाईकांनी समजावून सांगितल्यानंतर शीतलने तयारी दाखवली. पण मनातले दुःख आणि परीक्षेदरम्यानची होणारी चलबिचल ती व्यक्त करू शकली नाही. अशा परस्थितीमध्येही तिने मन घट्ट करून परीक्षा केंद्र गाठले आणि पेपर दिला.
पेपर दिल्यानंतर दुपारी 3 च्या दरम्यान शीतल घरी परतली. तेव्हाही वडिलांचा मृतदेह हा घरासमोरच होता. शीतलसमोरच सकाळची घटना घडली होती. आणि आता सर्वजण तिचीच वाट पाहत होते. अशा वातावरणात तिने इंग्रजीचा तर पेपर दिलाच शिवाय सर्व पेपर देणार असल्याचेही सांगितले आहे.