लातूर - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर सबंध राज्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलने केली जात आहेत. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या बाभाळगावातही गुरुवारी सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. सरकारकडून केवळ पोकळ आश्वासने दिली जात आहेत. मात्र, एकाही मराठा समाजाच्या नेत्याने आरक्षणाच्या मुद्याकडे आत्मीयतेने न पाहिल्याने हातातोंडाशी आलेला घास हिसकवला गेला असल्याची भावना आंदोलक व्यक्त करीत आहेत.
पालकमंत्री देशमुखांच्या बाभळगावातील गढीसमोर मराठा क्रांती मोर्चाचा घंटानाद - latur maratha protest
मराठा आरक्षणाला स्थगिती केवळ राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे मिळाली असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे. केवळ निवडणुकांसाठी समाजाचा उपयोग केला जातो मात्र, समाजाच्या मुख्य मागणीकडे कायम दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे आरक्षणाची स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांनी पालकमंत्र्यांच्या बाभळगावात घंटानाद आंदोलन सुरू केले आहे.
यापूर्वी मूकमोर्चाच्या माध्यमातून समाजाने लढा उभा केला होता. आता मात्र, ठोक मोर्चाच्या भूमिकेत समाज आहे. त्यामुळे आरक्षणाला स्थगिती मिळताच जाहीर केलेली पोलीस भरती रद्द करावे, वेळेत स्थगिती हटवावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. तर आंदोलकांची भूमिका योग्य आहे. सरकार त्यांच्यासोबत असल्याचे मत अमित देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले होते. मात्र, सरकारकडून आरक्षण टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे होते, असे मत आंदोलकांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, बाभळगावातील गढीसमोर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरू असून पालकमंत्री अमित देशमुख यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारावे, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.