लातूर - गणेशोत्सव म्हणजे तरुणाईचा उत्साह आणि कार्यक्रमांची रेलचेल असे समीकरण असते. मात्र, लातूर जिल्ह्यातील काही तालुके याला अपवाद राहिले आहेत. तर, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा परिणाम यंदाच्या देखाव्यावर आणि उपक्रमावर झाला आहे. जळकोट तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मूर्तींची स्थापना झाली मात्र, कार्यक्रम आणि देखाव्यांकडे मंडळांनी दुर्लक्ष केले आहे.
मागील दोन वर्षांपासूनच्या दुष्काळी स्थितीमुळे तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती आर्थिक अडचणीत आहे. तर, यंदाही पावसाचे प्रमाण कमी असल्याने गणेशोत्सव सर्वसाधारणपणे साजरा करीत असल्याचे गणेश मंडळाकडून सांगण्यात येत आहे. गणेश विसर्जनाला अवघे दोन दिवस बाकी असताना शहरातील गणेश मंचासमोर ना देखावे ना कार्यक्रम अशी स्थिती आहे.