लातूर - यंदा जिल्ह्यातील गणेश उत्सवावर दुष्काळाचे सावट होते. मात्र, गणेश भक्तांनी उत्सहामध्ये कमी न करता काल (रविवार) उदगीर येथील ७ दिवसांच्या बाप्पांना ढोल-ताशांच्या गजरात निरोप दिला. पोलीस प्रशासनाच्या डॉल्बी बंदला प्रतिसाद देत येथील मनाच्या आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक दुपारी १ च्या सुमारास मार्गस्थ झाली होती.
ढोल-ताशा अन् लेझिम पथकाच्या पारंपारिक वाद्याच्या सानिध्यात परंपरेनुसार सातव्या दिवशी गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीस मोठ्या उत्साहात सुरवात झाली. मानाच्या आजोबा गणपतीची येथील चौबारा चौकात जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, संजय बनसोडे यांच्याहस्ते महापूजा करून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. गेल्या सात दिवसांपासून विविध देखावे सादर करून मंडळांनी उदगीरकरांची मने जिंकली होती.