महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूर दुष्काळाच्या झळा गणपती बाप्पालाही, विसर्जनाऐवजी मूर्ती मंदिरात ठेवणार - गणेशमूर्तींचे विसर्जन होणार नाही

पाऊस झाला नसल्याने लातूरमध्ये दुष्काळ पडला आहे. मात्र, आता या लातूर दुष्काळाच्या झळा गणपती बाप्पालाही सहन कराव्या लागणार आहेत. कारण लातूरकरांनी गणपती मूर्तींचे विसर्जन न करण्याचे ठरवले आहे.

लातूर दुष्काळाच्या झळा गणपती बाप्पालाही

By

Published : Aug 29, 2019, 11:26 AM IST

Updated : Aug 30, 2019, 12:33 PM IST

लातूर -पाणीटंचाईच्या झळा आता विघ्नहर्त्यालाही सहन कराव्या लागणार आहेत. विसर्जनासाठी पाणीच नसल्याने यंदा गणेशमूर्तींचे विसर्जन होणार नाही, असा एकमुखी ठराव सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी शांतता कमिटीच्या बैठकीत घेतला. सर्व मूर्ती विधिवत पूजा करून सिद्धेश्वर मंदिरात ठेवण्यात येणार आहेत.

लातूरमध्ये गणेश विसर्जन होणार नाही

विसर्जनासाठी पाणीच नसल्याने काय पर्याय काढावा? असा सवाल जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी उपस्थित केला होता. यावर बराच वेळ चर्चा झाल्यानंतर यंदा पाऊस पडेपर्यंत गणेश मूर्तींचे विसर्जन करायचेच नाही. तोपर्यंत गणेश मूर्ती या सिद्धेश्वर मंदिर परिसरात ठेवण्याचा निर्णय झाला आहे. विसर्जनाच्या कालावधीपर्यंत पाऊस झाला, तर त्या-त्या ठिकाणी विसर्जन करता येणार आहे.

येत्या 2 सप्टेंबरला गणरायाचे आगमन होत आहे. यंदा या उत्सवावर लातुरात दुष्काळाचे अधिक सावट आहे. शिवाय गणेश मूर्तींच्या दरातही वाढ झाली आहे. या सार्वजनिक उत्सवाच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक पार पडली. गणेश मंडळांच्या अध्यक्षांच्या सूचना पोलीस यंत्रणा आणि महापालिकेचे आयुक्त एम. डी. सिंग यांनी जाणून घेतल्या. शहरातील रस्ते आणि नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी गणेश भक्तांनी केली, तर पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी उत्सव उत्साहात साजरा करा. मात्र, लातूरचा शांततेचा पॅटर्न कायम ठेवण्याचे आवाहन केले. शिवाय पोलीस उपाधीक्षक हिम्मत जाधव यांनीही मनोगत व्यक्त करून आवश्यक त्या सूचना केल्या.

जी. श्रीकांत यांनी यंदाच्या पाणीटंचाईचे वास्तव सर्व गणेश मंडळासमोर मांडले. त्यामुळे पाऊस झाला नाही, तर गणेश मूर्तींच्या विसर्जनाचे काय? असा सवाल उपस्थित झाला. त्यामुळे गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या नये आणि निर्माण झालेल्या समस्येवरही तोडगा निघावा यासाठी मानाच्या आणि मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करायचे नाही. सर्व मूर्तींची विधिवत पूजा करून सिद्धेश्वर मंदिरात ठेवाव्या. पाऊस झाल्यास त्यांचे विसर्जन करावे अन्यथा दान करण्यात याव्या, असा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात पाणीसाठा नाही. त्यावर दुसरा पर्यायही नसल्याने असा निर्णय घेण्याची नामुष्की ओढवली आहे. पाणीटंचाईमधून गणरायाची देखील सुटका झाली नाही. त्यामुळे ही अवस्था पाहून तरी पाऊस पडेल, असा आशावाद लातूरकरांना आहे. या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक नाना लाकाळ, माळी यांच्यासह इतर विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Last Updated : Aug 30, 2019, 12:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details