लातूर - कोरोनाग्रस्तांची उपचारापासून सुरू झालेली हेळसांड अखेर मृत्यूनंतरही कायम आहे. असाच धक्कादायक प्रकार लातूर येथे समोर आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तिघांचे मृतदेह हे शवागरात पडून आहेत. येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने ही वेळ आली आहे. यामुळे नागरिकांनी मनपासमोर आंदोलन करूनही प्रश्न अद्यापपर्यंत मार्गी लागलेला नाही.
अंत्यसंस्काराविना मृतदेह शवागारात; मृत्यूनंतरही कोरोनाग्रस्तांची अवहेलना - कोरोनाबाधित अंत्यसंस्कार आंदोलन बातमी
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला तरी शहरातीलच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली आहे. यामुळे लिंगायत समाजातील दोन आणि गोसावी समाजातील एकाचा मृतदेह शवागरात आहे. या ओढवलेल्या परिस्थितीमुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी मनपा समोर आंदोलन केले.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तीनशे पेक्षा अधिकजणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. शहरासह जिल्ह्यातील व्यक्तीचा मृत्यू झाला तरी शहरातीलच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे वाहनदेखील मार्गस्थ होऊ शकत नाही. त्यामुळे लिंगायत समाजातील दोन आणि गोसावी समाजातील एकाचा मृतदेह शवागरात आहे. या ओढवलेल्या परिस्थितीमुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी मनपा समोर आंदोलन केले.
यानंतर स्मशानभूमी लगत असलेल्या आर्वी गावात अंत्यसंस्कार करण्याचे ठरले मात्र, ग्रामस्थांनी हे कोरोनाबाधितांचे मृतदेह असल्याने विरोध केला आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्याने प्रशासन मृतदेह ताब्यात देत नाही. तर दुसरीकडे अंत्यसंस्कारही होत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. दिवसाकाठी ५ ते ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. मात्र, ओढवलेल्या या परिस्थितीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.