लातूर- मित्राने मित्राला फसवल्याची घटना औसा तालुक्यातील कन्हेरी गावात घडली आहे. शेतीवर काढलेल्या कर्जाच्या रकमेतून तब्बल 2 लाख 80 हजार मित्रानेच हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा -वृक्षलागवड उद्दिष्टपूर्ती कागदावरच; चौकशीचे संकेत मिळताच मार्चमध्ये सुरू केले वृक्षारोपण
याबाबत अधिक माहिती अशी की, औसा तालुक्यातील कन्हेरी येथील मुकुंद व्यंकटराव झिरमिरे यांनी एका खासगी बँकेकडून पीक कर्जपोटी 3 लाख 37 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या प्रक्रियेदरम्यान त्यांचे मित्र हंसराज वसंत आळंगे हे बरोबरच होते. मात्र, मुकुंद झिरमिरे यांना एटीएम कार्डचा वापर कसा करायचे हे माहीत नव्हते. त्यांच्या या अज्ञानाचा फायदा हंसराज याने घेतला. एटीएमचा वापर करून हंसपराजने मुकुंद यांच्या खात्यावरील तब्बल 2 लाख 80 हजार रुपये परस्पर काढले.
औसामध्ये मित्रानेच मित्राला गंडवले त्यानंतर पैशाची गरज भासल्यामुळे मुकुंद हे बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता, त्यांना एटीएमवरून पैसे काढले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तेव्हा हा सर्व प्रकार उजेडात आला. याप्रकरणी झिरमिरे यांनी औसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी हंसराज आळंगे यास अटक केली असता न्यायालयाने त्यास 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -चिकन मधून कोरोना.. संभ्रम दूर करण्यासाठी लातुरात 'चिकन फेस्टिव्हल'चे आयोजन