लातूर -दोन महिन्यांपूर्वी रेणापूर येथील सांगवी येथून एका 5 वर्षीय मुलाचे अपहरण झाले होते. यानंतर दोन दिवसांमध्ये हा मुलगा मुरुडजवळील चाटा येथे आढळला. परंतु, यामागे कोण होते, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. दोन महिन्यांनी या घटनेतील चार आरोपींना बेड्या ठोकण्यात आली आहे. यामध्ये अपहरण झालेल्या रियांश याची हुशारी आणि पोलिसांचे अथक परिश्रम कामी आले आहेत.
असे झाले अपहरण -
देवीदास विठ्ठल सावंत (69) हे मूळचे रेणापूर तालुक्यातील सांगवी येथील आहेत. परंतु गेल्या 40 वर्षांपासून व्यवसायाच्या निमित्ताने ते ठाणे येथे वास्तव्यास आहेत. शेतीवाडीच्या निमित्ताने ते गावाकडे येत असतात. 1 नोव्हेंबर रोजी देवीदास यांची पत्नी मधुमती या आपल्या दोन नातवांना घेऊन सांगवी या मूळ गावी आल्या होत्या. 11 नोव्हेंबर रोजी देवेश (7) आणि रियांश (5) हे दोन नातू गल्लीतील मुलांसोबत खेळत होती. मात्र, एका गाडीतून आलेल्या तिघांनी रियांशचे अपहरण केले. रात्री उशिरापर्यंत 5 वर्षांचा रियांश घरी परतला नसल्याने आजोबा देवीदास सावंत यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती. रियांशसाठी सांगवी हा परिसर नवीनच होता. शिवाय देविदास यांचे हे मूळ गाव असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती गावातील सर्वांनाच माहिती होती. त्याकरिता पैशासाठी अपहरण केली असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. परंतु, दोनच दिवसांनी मुरुड जवळील चाटा येथे रियांश पोलिसांना आढळला. गावापासून 20 ते 25 किमी असलेल्या गावी रियांश आलाच कसा याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी कामाला लागले. यामध्ये गुप्तहेरांकडून मिळालेली माहिती आणि 5 वर्षीय रियांश याचा हुशारकीपणा पोलिसांच्या कामी आला.