महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.

Former cm of maha shivajirao patil nilangekar passed away
Former cm of maha shivajirao patil nilangekar passed away

By

Published : Aug 5, 2020, 7:27 AM IST

Updated : Aug 5, 2020, 8:46 AM IST

निलंगा(लातूर ) - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. कोरोनाची बाधा झाल्यामुळे 16 जुलै रोजी त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वीच ते कोरोनामुक्तही झाले होते, त्यामुळे त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. परंतू आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास किडनी विकाराच्या आजाराने त्यांचं निधन झालं. त्यांचं पार्थिव निलंग्याला नेले जात असून तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

निलंगा विधानसभा मतदारसंघाचे सर्वाधिक काळ आमदार होते. निलंगा तालुक्यात शैक्षणिक गंगा आणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही यासाठी सतत प्रयत्न करणारे, तळागाळातील जनतेचे कैवारी, राजकारणातील निष्कलंक हिरा अशी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर याची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे अनेक सामान्यांचा नेता हरवला असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

नऊ महिने होते राज्याचे मुख्यमंत्री

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर राजकारणातील दिगग्ज व्यक्तिमत्त्व. ०९ फेब्रुवारी १९३१ रोजी निलंगा इथे त्यांचा जन्म झाला. ते हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक ही होते. एम.ए., एल.एल.बी. पर्यंत त्याचं शिक्षण झालं होतं. दादासाहेब या नावाने ते सर्वांना सुपरिचित होते. राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपदे त्यांनी लिलया सांभाळली. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर राज्याचे दहावे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी टाकली. ०३ जून १९८५ ते ०६ मार्च १९८६ असे नऊ महिन्यासाठी ते राज्याचे मुख्यमंत्री होते. अतिशय शिस्तप्रिय आणि कडक त्यांचा स्वभाव होता.

लातूर जिल्हा निर्मिती, औरंगाबाद खंडपीठ निर्मितीसाठी कुठलेच वादग्रस्त विधान त्यांच्या उभ्या राजकीय आयुष्यात आणि उतार वयातील राजकारणातही केलं नाही. अतिशय परिपक्व उत्तरे ते नेहमीच मुलाखतीत, पत्रकार परिषदेत देत असत. कोरोनासारख्या महाभयंकर आजारावर त्यांनी वयाच्या नव्वदीतही मोठ्या जिद्दीने मात केली होती. मात्र दुर्दैवाने त्यांचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. आणि राज्याच्या राजकारणातील पितामह असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला.

गांधी घराण्याशी त्यांची जवळीकता असलेले ते काँग्रेसचे अतिशय निष्ठावंत नेते होते. त्यांच्या निधनामुळे राजकारणात कधीही न भरून निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तर लातूर जिल्ह्यानेही एक मोठा नेता गमावला आहे.

Last Updated : Aug 5, 2020, 8:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details