लातूर (उदगीर) - जिल्ह्याच्या उदगीर नगरपालिकेतील 'एमआयएम' पक्षाच्या पाच नगरसेवकांसह जिल्हाध्यक्षाने आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्याने आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी 'एमआयएम'ला खिंडार पाडत अन्य पक्षांनाही सूचक इशारा दिला आहे.
गेल्या निवडणुकीत एमआयएसचे सात नगरसेवक -
लातूर जिल्ह्यातील बड्या नगरपालिकांमध्ये उदगीरचाही समावेश होतो. सध्या उदगीर नगरपालिकेवर भाजपाची सत्ता आहे. मागील निवडणुकीत येथे 'एमआयएम'ने मोठे यश संपादन करत तब्बल सात नगरसेवक निवडून आणले आहेत. लातूरच्या 'एमआयएम' पक्षाचे जिल्हाध्यक्ष ताहेर सय्यद हे उदगीर नगरपालिकेत विद्यमान नगरसेवक आहेत. भाजपाची सत्ता असलेल्या या नगरपालिकेची एकूण सदस्य संख्या 44 आहे. सध्या येथे भाजपा-23, काँग्रेस-14,एमआयएम-07, राष्ट्रवादी-00 अशी असे पक्षीय बलाबल आहे. मागील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी उदगीरची विधानसभा भाजपाच्या हाती होती. तत्कालीन भाजपा आमदार सुधाकर भालेराव यांनी नगरपालिका निवडणुकीत किंगमेकरची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारत संजय बनसोडे यांना पहिल्यांदाच आमदार केले. प्रथमच आमदार झालेले संजय बनसोडे महाविकास आघाडी सरकारमध्ये वजनदार खात्याचे राज्यमंत्री झाले.