निलंगा (लातूर) - कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या ग्रामीण भागात लोकांच्या हाताला काम नाही. यातच समता मायक्रो फायनान्सने ग्रामीण भागातील कर्जाच्या हप्त्याची वसूली करण्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वसूलीसाठी आलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला शिवसेनेच्या राज्य कामगार सरचिटनीस शिवाजी माने यांनी परत पाठवले आहे. त्यांचा याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरस झाला आहे.
वसूलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्याची फजिती... निलंगा तालुक्यातील ग्रामीण भागात समता मायक्रो व ग्रामीण कुट्टा युवस बँक यांच्याकडून अनेक नागरिकांनी कर्ज घेतले आहे. या कंपनीने ३ टक्के दर साल दर शेकडा व्याजदर सांगून ३६ टक्कांनी आठवड्याला किंवा महिन्याला कर्जदारांकडून वसूली केली आहे.
या प्रकारच्या अनेक खासगी कंपन्या जिल्ह्यातील अनेक गावात १० महिलांचा गट तयार करून पैसे देतात. सर्वसामान्य लोकांची यातून लूट होत आहे. परंतु, शासकीय अधिकारी आणि या कंपन्यांचे साटेलोटे असल्यामुळे यांच्यावर कोणीच कारवाई करत नाही. जिल्हा अधिकारी यांनी लक्ष घालून कर्जदारांची होत असलेली लूट थांबवावी, अशी मागणी शिवसेनेचे राज्य कामगार सेनेचे सरचिटणीस शिवाजीराव माने यांनी केली आहे.
मदनसुरी गावात समता मायक्रो फायनान्सचे वसूलीदार आले असता शिवाजी माने यांनी विरोध करत कर्जदारांचे पैसे परत देण्यास भाग पाडले. यापुढे गावात वसूलीसाठी याल तर याद राखा असा दमही दिला आहे. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गेल्या चार दिवसात निलंगासह मदनसुरी गावात कोरोचा विळखा वाढला आहे. मदनसुरी गावात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मदनसुरी गाव गेल्या पंधरा दिवसांपासून शंभर टक्के लाॅकडाऊन आहे. गावात येण्या- जाण्यास बंदी असताना खासगी कंपनीचे फायनान्स वसूली करणारे कर्मचारी वसूलीसाठी तळ ठोकून आहेत.