लातूर- आजही महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. याकडे प्रशासनाचे आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने आता राज्याच्या राजधानीत प्रमाणपत्रासाठीचा लढा देण्याचा निर्धार या समाज बांधवानी केला आहे. ४ ऑगस्टपासून आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय लातूर येथे पार पडलेल्या मराठवाडास्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे.
आदिवासी कोळी क्रांती सेनेच्या वतीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. जात प्रमाणपत्र काढताना आणि जात वैधता प्रमाणपत्र काढताना होत असलेल्या त्रासवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. समाजातील अनेक तरुणांना नौकरीच्या संधी असतानाही न्याय मिळत नाही. समाजात असलेल्या आर्थिक दुर्बलतेमुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधींना मुकावे लागत आहे. मागील अनेक वर्षापासून जातप्रमाणपत्राबाबत राज्य स्तरावर लढा देण्यात आलेला आहे. मात्र सरकारकडून अद्यापपर्यंत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे आंदोलनाची पहिली पायरी ही मुंबईला आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलनच्या स्वरूपात करण्यात येणार आहे.